इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयासह २-१ अशी आघाडी घेतली. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताच्या शानदार गोलंदाजीसमोर यजमानांना दुसऱ्या डावात २१० धावाच करता आल्या. भारताने हा सामना १५७ धावांनी जिंकला. याशिवाय विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा अव्वलस्थानी आला आहे.
सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघातील प्रत्येक खेळाडूच्या प्रयत्नाचे कौतुक केले. दरम्यान त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याबद्दल मोठा उलगडाही केला आहे.
कर्णधार म्हणाला, “परिस्थिती कठीण होती आणि आम्हाला माहित होते की, आमच्यासाठी येथे संधी असू शकते. त्यावेळी रविंद्र जडेजा खेळपट्टीच्या खराब झालेल्या भागात गोलंदाजी करू शकत होता. आज आमचे गोलंदाज रिव्हर्स स्विंगही खूप चांगले करत होते. त्यामुळे आम्हाला विश्वास होता की, आम्ही १० विकेट मिळवू शकतो. आम्हाला याची खात्री होती.”
कोहलीने सामन्यानंतर सांगितले की जसप्रीत बुमराह स्वतः त्याच्याकडे कसा आला आणि म्हणाला की त्याला गोलंदाजी करायची आहे. विराट पुढे म्हणाला, “चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागताच बुमराह माझ्याकडे आला आणि म्हणाला मला गोलंदाजी करू दे. त्यानंतर त्याने तो एक सुंदर स्पेल टाकला आणि तेव्हापासून सामना आमच्या बाजूने वळला. त्या २ मोठ्या विकेट्स होत्या. मला असे वाटते तुम्ही त्याची ती कामगिरी कायम लक्षात ठेवाल.” बुमराहने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जॉनी बेयरस्टो आणि ऑली पोप यांना त्रिफळाचीत केले.
फलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक विराट पुढे म्हणाला “रोहित शर्माने या सामन्यात विलक्षण फलंदाजी केली. शार्दुल ठाकूरने या सामन्यात जे काही केले ते अद्भुत असेच होते, त्याची कामगिरी वेगळी दिसून येते. त्याच्या दोन अर्धशतकांमुळे इंग्लंड संघ जेरीस आला. मला वाटते की, त्याने दोन्ही डावात खूप चांगली फलंदाजी केली.”
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुलच्या अष्टपैलू कामगिरीचा धुरळा! गेल्या ५२ वर्षांत ‘ही’ अद्भुत कामगिरी करणारा दुसराच भारतीय
किती रे मोठं मन तुझं! ‘सामनावीर’ पुरस्कार मिळूनही रोहित म्हणे, मी नाही खरा नायक तर ‘तो’ आहे