भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंड दौर्याची तयारी करत आहे. आगामी 2 जून रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार असून सध्या विराट आणि भारतीय संघ मुंबईत क्वारंटाईन आहेत. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ सुरुवातीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना व त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
दरम्यान, शनिवारी विराटने क्वारंटाईन असताना त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान चाहत्यांनीही विराटला अनेक मजेशीर प्रश्न विचारले व विराटने देखील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, एका चाहत्याने विराटला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी असलेल्या नात्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर विराटने अशाप्रकारे दिले की त्यामुळे त्याने हजारो चाहत्यांची मने जिंकली.
चाहत्याने विराटला धोनीबरोबरच्या नात्याबद्दल केवळ दोन शब्दांत बोलण्यास सांगितले. विराटने यावेळी उत्तर दिले, ‘विश्वास आणि आदर’. विराटच्या या उत्तराने अनेक चाहते खुश झालेले दिसले. दरम्यान, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, विराटने अनेक वेळा धोनीबद्दल आपल्या मनात असलेला आदर व्यक्त केलेला आहे.
अनेक वेळा तो पत्रकार परिषदेमध्ये धोनीचा त्याच्या कारकिर्दीवर असलेला प्रभाव स्पष्टपणे सांगतो. विराट व धोनी जोपर्यंत मैदानावर सोबत खेळत होते, तोपर्यंत त्या दोघांमध्ये फार चांगले नाते असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. विराटने वेळोवेळी कबुली दिली आहे की, त्याने महेंद्रसिंग धोनी कडून बरेचसे नेतृत्वगुण शिकले आहेत.
दरम्यान, आगामी काळ हा विराटसाठी अतिशय खडतर असणार असून, त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा व इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा बहुप्रतिक्षित दौरा करावा लागणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात 18 जून ते 22 जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळेल व त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवातीला होईल. 2018 साली झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाला असल्यामुळे या दौऱ्यात भारतीय संघावर प्रचंड मानसिक दबाव असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रवींद्र जडेजाने उलगडला संघाबाहेर असतांनाचा अनुभव, ‘या’ गोष्टीचा सतत करायचा विचार
टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘या’ भारतीय खेळाडूवर असेल सर्वाधिक दबाव, माजी दिग्गजाने मांडले मत
तब्बल ७ वर्षांनंतर कसोटी खेळण्यास भारतीय महिला संघ सज्ज, पाहा ‘अशी’ आहे नवी जर्सी