भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असलेले सौरव गांगुली हे आयपीएल २०२१ आणि टी२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहेत. गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी बीसीसीआयची बैठक शनिवारी (२९ मे) पार पडली. दरम्यान, गांगुली यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक छायाचित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये तो आपल्या वडिलांसोबत दिसतोय. सौरव गांगुली यांचे वडील चंदीदास गांगुली यांचे दीर्घ आजारामुळे २०१३ मध्ये निधन झाले होते.
शेअर केले वडिलांसोबतचे छायाचित्र
गांगुली यांनी इंस्टाग्रामवर जे छायाचित्र शेअर केले आहे त्यात त्यांचे वडील स्टेजवर दिसत आहेत. कर्णधार म्हणून गांगुली त्यांनी ट्रॉफी जिंकलेली दिसतेय. गांगुली यांनी या छायाचित्राखाली कॅप्शन देताना लिहिले आहे की, ‘काही क्षण तुमच्याबरोबर राहतात …आपल्या वडिलांसमक्ष भारताचा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टेजवर’ या छायाचित्राला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
https://www.instagram.com/p/CPbN2zMgd5W/
मुलांच्या कारकीर्दीत निभावली होती मोठी भूमिका
चंदीदास गांगुली यांनी आपल्या दोन्ही मुलांची कारकीर्द सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते बंगाल क्रिकेट असोसिएशन (कॅब) शी देखील संबंधित होते. १९७४-१९७५ मध्ये ते संघटनेचे सहसचिव झाले. यानंतर ते कोषाध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाचे सदस्यही होते. २००५ मध्ये गांगुली यांना कसोटी संघातून वगळल्यानंतर त्यांनी संघटनेमध्ये जाणे थांबवले. सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहासिश गांगुली हादेखील प्रथमश्रेणी क्रिकेटपटू राहिला आहे.
भारताचे यशस्वी कर्णधार आहेत गांगुली
सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. गांगुली यांच्या नेतृत्वात भारताने कसोटी व वनडे मध्ये मिळून एकूण १९६ सामने खेळले आहेत. त्यापैकी ९७ सामन्यात विजय तर, ७६ सामन्यात पराभव पत्करावा लागला. गांगुली यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने २००३ क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सन २००५ मध्ये ग्रेग चॅपेल भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यानंतर उफाळून आलेला वाद चांगलाच गाजला. या वादानंतर गांगुली यांना संघाबाहेर देखील करण्यात आले. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सामना खेळल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीने ‘कॅप्टन कूल’ धोनीबरोबरच्या नात्याचे केवळ ‘या’ दोन शब्दात केले वर्णन
रवींद्र जडेजाने उलगडला संघाबाहेर असतांनाचा अनुभव, ‘या’ गोष्टीचा सतत करायचा विचार
टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘या’ भारतीय खेळाडूवर असेल सर्वाधिक दबाव, माजी दिग्गजाने मांडले मत






