मुंबई । भारतीय कर्णधार विराट कोहली सर्वात तंदुरुस्त खेळाडू मानला जातो. जिममध्ये तो अनेक प्रकारचे व्यायाम करत असतो. एक व्यायामाचा प्रकार असाही आहे जो की तो आयुष्यभर करू शकतो. नुकतेच कोहलीने क्रिकेट फॅन्स बरोबर या व्यायामाच्या प्रकाराबद्दल खुलासा केला आहे.
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो डेडलीफ्ट करताना दिसून येत आहे. या व्हिडिओला कॅप्शनमध्ये देताना लिहले की, “जर मला कोणता व्यायामाचा प्रकार रोज करायचा असेल तर मी हेच निवडेन.” कोहलीचा हा व्हिडिओ क्रिकेट फॅन्सला खूपच पसंत पडला आहे. क्रिकेट फॅन्सने देखील त्याच्या फिटनेसचे कौतुक केले आहे.
टाळेबंदीच्या काळात केविन पीटरसन सोबत बोलत असताना कोहलीने सांगितले होते की, ‘भारताचा माजी ट्रेनर शंकर बासू यांच्या सांगण्यावरून वेटलिफ्टिंग सुरू केले होते.’ विराट आणि बासू यांची पहिल्यांदा भेट आयपीएल टीम बंगलोर रॉयल चॅलेंजर्सच्या सराव शिबिरात झाली होती. विराट कोहलीला पाठदुखीचा त्रास होता. सुरुवातीला वेटलिफ्टिंगचा सराव तो दबकतच करत होता. त्यानंतर त्याला या व्यायामाची आवड निर्माण झाली.
यापूर्वी विराट कोहलीने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला होता. पंड्याने त्याचा भाऊ क्रुणाल पंड्याला चॅलेंज दिले होते. कोहलीने हे चॅलेंज टाळी वाजवत पुश अप पूर्ण करून दाखवले. कोहली टाळेबंदीच्या काळातही जिमला जात होता. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तो घरीच असलेल्या जीममध्ये व्यायाम करायचा.