२७ कसोटी शतके, ४३ वनडे शतके तसेच कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० या तिन्ही क्रिकेट प्रकारात ५० पेक्षा अधिक सरासरी, हे आकडे पाहून समजते की, नेमकी चर्चा कोणत्या खेळाडूची होत आहे. हा खेळाडू इतर कोणी नसून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटची गणना सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके ठोकणारा विराट (Virat Kohli) जगातील सर्वात मोठा मॅच विनर आहे. परंतु आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, विराट इतका यशस्वी झाला कसा? साधारण गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मेहनतीने आणि आपल्या चूका सुधारून तो इथपर्यंत पोहोचला आहे. परंतु एक वेळ अशी होती की, तो मेहनतीबरोबरच अंधविश्वासावरही विश्वास ठेवत होता. आज आपण या लेखात विराटच्या त्या अंधविश्वासाबद्दल (Superstition) चर्चा करणार आहोत, ज्यामुळे त्याला मैदानावर पाऊल देखील ठेवू देत नव्हता.
विराटचा अंधविश्वास-
क्रिकेटच नव्हे तर जगातील प्रत्येक खेळामध्ये खेळाडू नेहमी काहीतरी अंंधविश्वास बाळगत असतात. ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीला स्वत:साठी खूप भाग्यशाली मानतात. विराटचादेखील यामध्ये समावेश होता. विराटने जे ग्लोव्हज घालून शतकी खेळी केली होती. ते ग्लोव्हज विराट कधीच बदलत नव्हता. म्हणजेच तो खूप काळापर्यंत सतत एकच ग्लोव्हजचा वापर करत होता. त्याला असे वाटत होते की, तो ते ग्लोव्हज घालून नेहमी चांगल्या धावा करतो. विराटने एका मुलाखतीदरम्यान हे मान्यदेखील केले होते. तो म्हणाला होता की, तो खूप अंधविश्वास बाळगत होता.
धोनीने तोडला विराटचा अंधविश्वास-
विराटने एका मुलाखतीत सांगितले होते की, २०११मध्ये इंंग्लंड दौऱ्यावर त्याचा अंधविश्वास नष्ट झाला होता याचे श्रेय जाते भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni). विराट पुढे म्हणाला की, या दौऱ्यात खेळण्यात आलेली वनडे मालिका त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती. कारण तो दुखापतीनंंतर पुनरागमन करत होता. विराटने त्या मालिकेतील पहिल्या सामान्यात अर्धशतकी खेळी केली होती. परंतु पुढील ३ सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.
फ्लॉप झाल्यानंतर विराट खूप चिंतेत होता. त्यानंतर धोनी त्याच्याजवळ गेला आणि त्याच्याशी चर्चा केली. विराटने धोनीला आपल्या मानसिकतेबद्दल सांगितले. यानंतर धोनीने त्याला सांगितले की, हे सर्वकाही सोड आणि केवळ मैदानावर क्रिकेट खेळण्यात लक्ष दे.
अंधविश्वास सोडताच विराट झाला हिट-
विराट १६ सप्टेंबर २०११ला पहिल्यांदा नवीन पॅड आणि नवीन ग्लोव्हज घालून मैदानावर उतरला होता. त्या सामन्यात त्याने शानदार शतक ठोकले होते. त्याने ९३ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०७ धावा केल्या होत्या. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला. परंतु विराटला एक गोष्ट समजली की धावा बनविण्यासाठी अंधविश्वास नाही तर स्वत:वर विश्वास ठेवावा लागतो.
अंधविश्वास सोडताच विराटची फलंदाजी बदलली. त्याने कार्डिफ वनडेपूर्वी ६० डावांमध्ये ४२.२६ च्या सरासरीने २२४० धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ५ शतकांचा समावेश होता. तर कसोटीत विराटने केवळ ३ सामने खेळले होते आणि त्याने १५.२० च्या सरासरीने ७६ धावा केल्या होत्या. परंतु अंधविश्वास सोडताच विराटने जसे काही धावांचा पाऊसच पाडायला सुरुवात केली होती.
अंधविश्वास नष्ट झाल्यानंतर विराटने पुढील १७९ सामन्यांमध्ये ६५.४८ च्या सरासरीने ९६२७ धावा केल्या होत्या. यामध्ये ३८ शतकांचा समावेश आहे. त्यानंतर विराटने १४० कसोटी डावांमध्ये ५५.१० च्या सरासरीने ७१६४ धावा केल्या. त्यात २७ शतकांचा समावेश आहे.