इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवला. पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. मात्र, भारतीय संघाने सामन्यात पुन्हा जोरदार पुनरागमन करत सामना आपल्या खिशात टाकला. यासह भारतीय संघाने या मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली. तसेच या विजयासह भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक नवा किर्तीमान प्रस्थापित केला.
चौथ्या कसोटी सामन्यात मिळालेल्या विजयासह इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार असा विक्रम विराट कोहलीने प्रस्थापित केला आहे. कोहलीने इंग्लंडमध्ये त्याच्या नेतृत्वात ३ वेळा कसोटी सामने जिंकले आहेत. असे करत त्याने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला. कपिल देव यांनी याआधी इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून २ कसोटी सामने जिंकले होते.
तसेच महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि अजित वाडेकर यांनी त्यांच्या नेतृत्वपदात इंग्लंडमध्ये कसोटीत प्रत्येकी १ विजय मिळवला होता. त्यामुळे या विजयासह कर्णधार विराट कोहली या यादीत अव्वल क्रमांकावर येऊन पोहोचला.
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने या मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली आहे. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने केवळ १९१ धावांत केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने २९० धावा करत ९९ धावांची आघाडी घेतली होती. ज्यामुळे पहिल्या डावातच भारतीय संघ बॅकफूटवर पडला होता.
मात्र, त्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात उत्कृष्टपणे पुनरागमन केले. भारतीय फलंदाजांनी आपल्या फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत इंग्लंड विरुद्ध तब्बल ४६६ धावांचा डोंगर उभा केला होता. ज्यामुळे इंग्लंडला या सामन्यासाठी ३६८ धावांचे आव्हान मिळाले. भारतीय फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी नंतर भारतीय गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली.
सुरुवातीला ३६८ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडकडून हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली होती. ज्यामुळे इंग्लंडचा संघ चांगल्या स्थितीत आला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी देखील कमालीचे प्रदर्शन करत सामन्यात पुन्हा पुनरागमन केले. यानंतर इंग्लंडचे सलामीवीर वगळता इतर कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला भारताच्या भेदक गोलंदाजीचा सामना करता आला नाही.
दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ २१० धावांवर गारद झाला. यासह भारतीय संघाने हा सामना १५७ धावांनी काबीज केला. ज्यामध्ये भारताकडून गोलंदाजी करताना उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या.
महत्वाच्या बातम्या –
–‘ओव्हल’चा विजय साधासुधा नाहीये; जो पराक्रम आजवर पाकने तीनदा केलाय, तोच भारताने पहिल्यांदाच केलाय
–धोनी, गांगुलीला नाही जमलं ते विराटने करून दाखवले, ३५ वर्षांपूर्वीच्या कपिल देवच्या पराक्रमाची केली बरोबरी
–रोहित सुपरहिट! सामनावीराचा पुरस्कार मिळवत ‘या’ यादीत युवराजला टाकले मागे