भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुंबईमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. यादरम्यान अनेक खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. नुकतेच शनिवारी (२९ मे) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर प्रश्न-उत्तरांचे सत्र आयोजित केले होते. या सत्रादरम्यान त्याने त्याच्या लाडक्या लेकीच्या नावाचा अर्थ सांगितला आहे.
असा आहे वामिका नावाचा अर्थ
विराटने आयोजित केेलेल्या प्रश्न-उत्तराच्या सत्रात एका चाहत्याने विराटला प्रश्न विचारला की ‘वामिकाचा अर्थ काय आहे? ती कशी आहे आणि तिची एक झलक आम्हाला पाहायला मिळणार आहे का?’ विराट आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे.
चाहत्याच्या प्रश्नावर विराटने उत्तर दिले की ‘वामिका हे देवी दुर्गाचे दुसरे नाव आहे. आम्ही जोपर्यंत आमच्या मुलीला सोशल मीडिया समजत नाही, तोपर्यंत तिला सोशल मीडियावर एक्स्पोझ न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तिला तिची निवड करु देणार आहोत.’
विराटने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती मुलगी झाल्याची गोड बातमी –
यावर्षी ११ जानेवारी रोजी अनुष्का शर्माने मुंबईत मुलीला जन्म दिला होता. मुलीच्या जन्माबद्दल विराटने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले होते की, ‘आम्हाला सोमवारी(११ जानेवारी) दुपारी मुलगी झाली आहे. आम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे आणि शुभेच्छांबद्दल आभार मानतो. अनुष्का आणि बाळाचे आरोग्य उत्तम आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन पर्वाची सुरुवात करण्यास उत्सुक असून आमच्या खासगी जीवनाचा आदर राखला जाईल अशी अपेक्षा करतो.’
विराटने घेतली होती पालकत्व रजा
विराटने आपल्या बाळाचे आगमन होणार असल्याने मागील वर्षाच्या अखेरीस पालकत्व रजा बीसीसीआयकडून मंजूर करुन घेतली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे, टी२० मालिका आणि कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतला होता. त्याने म्हटले होते की त्याला त्याच्या आयुष्यातील या सुंदर क्षणांचा साक्षीदार व्हायचे आहे. या क्षणांना तो गमावू इच्छित नाही.
पुढील महिन्यात विराट इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना
विराट पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात तो भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या दौऱ्यात भारताला साउथँम्पटन येथे न्यूझीलंड विरुद्ध १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तर त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्या’ काळात मी आठ-नऊ दिवस न झोपता सामने खेळत होतो, अश्विनचा धक्कादायक खुलासा
“एकाच वेळी भारताचे तीन दर्जेदार संघ खेळू शकतात”, पाकिस्तानच्या दिग्गजाकडून कौतुक
आयपीएलसाठी रोहित शर्मा झाला तयार? मुंबई इंडियन्सने केले ‘हे’ भन्नाट ट्विट