अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात मंगळवारी (१६ मार्च) तिसरा टी२० सामना पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. असे असले तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतक करताना एक वैयक्तिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
विराटचे अर्धशतक
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. यावेळी पहिल्या तीन विकेट्स ६ षटकांच्या आतच गेल्यानंतर विराटने कर्णधारपदाला साजेशी अशी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने पहिल्यांदा रिषभ पंत (२५)बरोबर ४० आणि नंतर हार्दिक पंड्यासह ७० धावांची भागीदारी रचली. तसेच यादरम्यान त्याने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला २० षटकात ६ बाद १५६ धावा करता आल्या.
विराटचा विक्रम
विराटने या सामन्यात नाबाद अर्धशतक केल्याने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा नाबाद ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने ५० वेळा नाबाद राहात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
हा विक्रम करताना त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित ४९ वेळा नाबाद राहात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. त्याच्यापाठोपाठ एमएस धोनी असून त्याने अशी कामगिरी ४८ वेळा केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा नाबाद राहात ५०+ धावांची खेळी करणारे भारतीय क्रिकेटपटू –
५० वेळा – विराट कोहली
४९ वेळा – सचिन तेंडुलकर
४८ वेळा – एमएस धोनी
३५ वेळा – राहुल द्रविड
३३ वेळा – मोहम्मद अझरुद्दीन
भारताचा पराभव
मंगळवारी झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने विराटच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला १५७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने जेसन रॉयची(९) विकेट चौथ्याच षटकात गमावली होती.
मात्र त्यानंतर जोस बटलरने पहिल्यांदा डेव्हिड मलानला(१८) साथीला घेतले. त्याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर नाबाद ७७ धावांची भागीदारी जॉनी बेअरस्टो(४०*) बरोबर करत इंग्लंडला १९ व्या षटकात विजय मिळवून दिला. यावेळी बटलरने ५२ चेंडूत नाबाद ८३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद! ‘ही’ महिला क्रिकेटपटू देणार पुरुष संघाला क्रिकेटचे धडे
अझरुद्दीनचा ‘सुपरमॅन’ अवतार, चित्त्याच्या चपळाईने केला रनआउट, पाहा व्हिडिओ