अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारी (१२ मार्च) पहिला टी२० सामना पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शुन्यावर बाद होत नकोसा विक्रम केला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताने सलामीवीर केएल राहुलची विकेट दुसऱ्याच षटकात गमावली. त्यापाठोपाठ तिसऱ्या षटकात विराट शुन्य धावेवर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल ख्रिस जॉर्डनने घेतला. विराटची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद होण्याची २८ वी वेळ होती. यातील १४ वेळा तो भारताचे नेतृत्व करताना शुन्यावर बाद झाला आहे.
सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणारे कर्णधार
विराट भारताचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ व्यांदा शुन्यावर बाद झाला. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळी शुन्यावर बाद होणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. या नकोशा विक्रमाच्या यादीत त्याने सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुली त्याच्या कारकिर्दीत १३ वेळा शुन्यावर बाद झाला आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणाऱ्या जगातील एकूण कर्णधारांमध्ये विराट ५ व्या क्रमांकावर आला आहे. त्याने स्टिव्ह वॉ आणि हन्सी क्रोनिए यांची बरोबरी केली आहे. वॉ आणि क्रोनिए हे सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकी १४ वेळा संघाचे नेतृत्व करताना शुन्यावर बाद झाले आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग असून ते २७ वेळा बाद झाले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारे कर्णधार –
२७ – स्टिफन फ्लेमिंग
२० – माहेला जयवर्धने, अर्जूना रणतुंगा
१८ – रिकी पाँटिंग, ग्रॅमी स्मिथ
१५ – सनथ जयसुर्या
१४ – स्टिव्ह वॉ, हन्सी क्रोनिए, विराट कोहली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारे भारतीय कर्णधार –
१४ – विराट कोहली
१३ – सौरव गांगुली
११ – एमएस धोनी
१० – कपिल देव
८ – मन्यूर अली खान पतौडी (नवाब पतौडी)
पहिल्यांदाच सलग दोन सामन्यात शुन्यावर बाद
विराट त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सलग दोन आंतरराष्ट्रीय सामन्यात शुन्यावर बाद झाला आहे. याआधी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळताना शुन्यावर बाद झाला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी२० मालिकेतील पहिलाच सामना खेळताना तो शुन्यावर बाद झाला.
इंग्लंडने जिंकला सामना
पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला १२५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने १५.३ षटकात २ बाद १३० धावा करत सहज पूर्ण केले आणि सामना जिंकला. याबरोबरच ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
आदिल रशीदला मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली भोपळाही न फोडता माघारी, पाहा व्हिडिओ
विराट जिथे विक्रम तिथे! रोहित, धोनी, रैना आणि कार्तिकनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पाचवाच भारतीय