काल २०१६ चा मोसमातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भारताचा कर्णधार विराट कोहलीची निवड विस्डेनने केली. ही भारतीय क्रिकेटसाठी खऱ्या अर्थाने मोठी गोष्ट आहे. विस्डेनने २००३ सालापासून ‘विस्डेन लिडिंग क्रिकेटर’ हा पुरस्कार क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जगातील क्रिकेटरला द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत १४ क्रिकेटपटूना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात भारताचे ३ खेळाडू असून वीरेंदर सेहवागला हा पुरस्कार सलग दोन वर्ष अर्थात २००८ आणि २००९ साली मिळाला आहे.
इतिहास विस्डेनचा:
विस्डेनचा पहिला अंक १८६४ साली युनाइटेड किंग्डम येथे पब्लिश करण्यात आला आणि पहाता पहाता क्रिकेट जगतातील एक प्रतिष्टेची जागा विस्डेनने कधी व्यापली समजलंच नाही. सुरुवातीच्या काळात विस्डेन हा एक जॉन विस्डेन आणि कंपनीचा छोटासा भाग होता. ही कंपनी क्रीडा साहित्य बनवणे आणि विकणे या क्षेत्रात काम करत होती. जॉन विस्डेन हा इंग्लंडच्या टीमचा सदस्य होता. ज्याने बोटीने प्रवास करून १८५९ मध्ये जगातील पहिला क्रिकेटचा परदेश दौरा केला होता. त्याच्या क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याने विस्डेन हे वार्षिक मासिक प्रसिद्ध केले. त्यात त्याने अतिशय अचूक स्कोर आणि मनोरंजक गोष्टी प्रसिद्ध केल्या. आज त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या मासिकाची अंदाजे किंमत २५,००० डॉलर आहे. १९३७ साली, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्डेन प्रसिद्ध व्हायला फक्त ४८ तास बाकी होते आणि त्याच वेळी जर्मन सैन्याकडून झालेल्या बॉम्ब हल्ल्याला विस्डेनच मुख्यालय बळी पडलं. ते एक वर्ष सोडलं तर आजपर्यंत विस्डेन कधीही प्रसिद्ध झाले नाही असे झाले नाही. २०१३ साली विस्डेनने १५० वर्ष पूर्ण केलं.
भारत आणि विस्डेन:
२००३ सालापासून ४ वेळा भारतीय क्रिकेटपटूना हा पुरस्कार मिळाला आहे. २००८,२००९ साली वीरेंदर सेहवाग, २०१० साली सचिन तर २०१६ म्हणजे आता विराट असे हे चार खेळाडू आहे. २००७ साली ६० तज्ज्ञांच्या पॅनलने १९०० सालापासून ते २००२ सालापर्यंतचे विस्डेनचे लिडिंग क्रिकेटर शोधले. आणि त्यांची नवे घोषित केली. त्यात १९९८ला सचिन तेंडुलकर तर १९८३ ला कपिल देवला तो वर्षातील सर्वोत्तम खेळाडू घोषित केले. ज्यांच्या नावाने भारतात रणजी सामने घेतले जातात त्या महाराजा रणजितसिंगजी यांना १९०० या वर्षाततील हा पुरस्कार घोषित करण्यात आला तो २००७ या साली.
महा विस्डेन आकडेवारी…
१० वेळा डॉन ब्रॅडमन यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरने गौरविण्यात आले आहे. वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स यांना ८ वेळा हा सन्मान मिळाला आहे. कपिल देव आणि सचिन हे दोघेच असे भारतीय आहेत ज्यांना हा पुरस्कार दोन वेळा मिळाला आहे. तर मुरलीधरन आणि संगकारा हे अन्य आशियायी खेळाडू आहेत ज्यांना हा पुरस्कार दोन वेळा मिळाला आहे. सर विवियन रिचर्ड्स, शेण वॉर्न, जॅक हॉब्स यांना हा पुरस्कार ३ वेळा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तब्बल ३५ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनतर इंग्लंड (२८), वेस्ट इंडिज(२०), दक्षिण आफ्रिका(८), भारत(६), श्रीलंका (५), न्यूजीलन्ड(३), पाकिस्तान(२) या देशांनी पुरस्कार मिळविले आहे.
विराट १५ वा भारतीय
विस्डेनच्या मोसमातील सर्वोत्तम खेळाडू आणि क्रिकेटर्स ऑफ द इयर(४ खेळाडूंना पुरस्कार ) असे मिळून १५ वा भारतीय आहे ज्याला हा पुरस्कार मिळाला आहे. या यादीत शिखर धवन, दिलीप वेंगसकर, राहुल द्रविड सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.