टी२० विश्वचषकाचा सुपर-१२ टप्पा दुबई येथे भारत आणि स्कॉटलंड यांच्यात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय गोलंदाजांनी त्याचा निर्णय योग्य ठरवला आणि स्कॉटलंडचा डाव १७.४ षटकात ८५ धावांवर गुंडाळला. नाणेफेक जिंकताच विराट कोहलीने एका आगळ्या वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी विराटचा ३३ वा वाढदिवस होता.
भारत-स्कॉटलंड सामन्यासाठी नाणेफेक करण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि स्कॉटलंड संघाचा कर्णधार कायल कोएत्झर मैदानात उतरले. नाणेफेक जिंकताच विराटने आपल्याच वाढदिवशी नाणेफेक जिंकण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी त्याने दुसऱ्यांदा केली आहे.
याआधी विराटने २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याने त्याच्या वाढदिवशी नाणेफेक जिंकली होती. त्यामुळे तो वाढदिवशी २ किंवा त्यापेक्षा अधिकवेळा नाणेफेक जिंकणारा तिसराच कर्णधार ठरला.
अशी कामगिरी सर्वात आधी व्हीव्हीयन रिचर्ड्स यांनी केली होती. त्यांनी १९८६ आणि १९९० साली या विक्रमाची नोंद केली होती. त्यांनंतर ग्रॅमी स्मिथने २००४ आणि २०१३ साली या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली होती.
या सामन्यात स्कॉटलंडचा डाव ८५ धावांवर आटोपला. भारताकडून रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रत्येकी ३ बळी घेतले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० धावांत २ बळी घेतले, तर रविचंद्रन अश्विनला १ बळी मिळाला. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सेने सर्वाधिक २४ धावा केल्या, तर मायकेल लीस्कने २१, कॅलम मॅक्लिओडने १६ आणि मार्क वॉटने १४ धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
स्कॉटलंडकडून मिळालेले ८६ धावांचे लक्ष्य भारताने केवळ ३९ चेंडूत पूर्ण केले. सूर्यकुमार यादवने विजयी षटकार ठोकला. भारताने हा सामना ८ गडी राखून सहज जिंकला. नेट रनरेटच्या बाबतीत भारतीय संघ अफगाणिस्तानपेक्षा वर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता अफगाणिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी ४ गुण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक: उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंडचा मार्ग सुकर, नामिबियाचा केला ५२ धावांनी पराभव
खुलासा! ‘या’ कारणामुळे रोहित घालतो ४५ क्रमांकाची जर्सी, स्वत: ‘हिटमॅन’ने उघड केले गुपीत