इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह खेळत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात वेगवान गोलंदाजांसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल होती. ढगाळ वातावरण होते आणि फ्लड लाईट चालू होते. तरीही विराट कोहलीला फिरकीपटू रवींद्र जडेजा याच्याकडून गोलंदाजी करून घ्यावी लागली. पण यामागचे नेमके कारण काय होते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
याचे कारण म्हणजे संथ गती गोलंदाजी होय. भारतीय गोलंदाजांनी संथ गतीने गोलंदाजी केल्यामुळे कर्णधार कोहलीला पिरकीपटू जडेजाला गोलंदाजीसाठी आणावे लागले. इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. परंतु या सामन्यात संथ गतीने षटके टाकल्याने भारतीय संघाने चार पैकी दोन गुण गमावले होते.
सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील प्रत्येक सामना आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. अशा परिस्थितीत, पुढील दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येक गुण संघासाठी महत्वाचा ठरणार आहे.
लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर अजूनही गवत आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल नाही. अशा परिस्थितीत दोन्हीकडून वेगवान गोलंदाजांची गरज होती. यानंतरही कोहलीला जडेजाकडे गोलंदाजी द्यावी लागली. याचे मुख्य कारण म्हणजे आयसीसीचे संथ गतीच्या षटकांचे ‘नो टॉलरन्स धोरण’ आहे.
जडेजा दुसऱ्या दिवसातील शेवटच्या सत्रात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. मात्र, त्याने केवळ चार षटके टाकली. यानंतर मोहम्मद शमी त्याच्या जागी गोलंदाजी करण्यासाठी आला. शमीने येताच रोरी बर्न्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडला दोन झटके दिले, ज्यामुळे यजमानांनी लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत तीन बाद 119 धावा केल्या होत्या. सिराजने 34 धावांत दोन बळी घेतले.
दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार जो रूट 74 चेंडूत सहा चौकारांसह 48 धावांवर खेळत होता, तर जॉनी बेअरस्टो सहा धावा करून त्याला साथ देत होता. तत्पूर्वी, जेम्स अँडरसनने भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवताना 62 धावांत पाच बळी घेतले, ज्यामुळे भारताचा पहिला डाव 364 धावांवर आटोपला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रहाणे आणि पुजारा असे खेळाडू आहेत, ज्यांना संघाबाहेर केलं तरी ते काही बोलणार नाहीत’
मैं तो नागिन नागिन… लॉर्ड्सच्या बाल्कनीत कोहलीने धरला ठेका, सहकाऱ्यांना हसू अनावर