पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. बाबरचं कसोटी क्रिकेटमधील शेवटचं अर्धशतक डिसेंबर 2022 मध्ये आलं होतं. त्याला गेल्या 616 दिवसांपासून कसोटीमध्ये 50 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर बाबरला संघातूनही वगळण्यात आलं आहे. दरम्यान, आता भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानं त्याला एक सल्ला दिला.
वीरेंद्र सेहवागनं बाबर आझमला कमबॅकचा मार्ग सांगितला आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं सेहवागला बाबरबद्दल विचारलं होतं. शोएबनं सेहवागला विचारलं की, बाबर आझमच्या तंत्रात काही चूक आहे का? कारण तो सतत फ्लॉप होत आहे. याला उत्तर देताना सेहवाग म्हणतो, “तो एक मोठा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा एखादा मोठा खेळाडू एखाद्या सामन्यातून किंवा मालिकेतून वगळला जातो, तेव्हा तो जोरदार पुनरागमन करतो. मी बाबरला सध्या क्रिकेटपासून दूर राहण्याचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सल्ला देईन. त्यानं काही काळानंतर सराव करावा आणि आधी देशांतर्गत क्रिकेट खेळावं. नंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत झाल्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करावं.”
बाबर आझम गेल्या 2 वर्षांपासून कसोटमध्ये सतत फ्लॉप होत होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संघातून वगळण्यात आलं. यानंतर पाकिस्ताननं दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला. बाबरच्या जागी कामरान गुलामला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शानदार शतक झळकावलं. त्यामुळे आता बाबर आझमला पुन्हा पाकिस्तानच्या संघात कधी संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
रोहित शर्माच्या नेतृत्वावर आकाश चोप्रांची टीका; म्हणाले, “हा निर्णय समजण्यापलीकडचा…”
कागिसो रबाडानं रचला कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा रेकॉर्ड; डेल स्टेन, वकार युनूससारख्या दिग्गजांना टाकलं मागे
टीम इंडियाबाहेर असलेला हा खेळाडू ठोकतोय शतकावर शतकं! ब्रायन लाराचा विक्रमही मोडला