आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. विजयाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. त्यामुळे भारतीय चाहते भलतेच निराश झाले आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदाचे काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटू याबाबत आपले मत मांडताना दिसून येत आहेत. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील याबाबत आपले मत मांडले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत नामिबिया संघाविरुद्ध झालेला सामना विराट कोहलीसाठी टी२० संघाचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना ठरला. त्यांनतर रोहित शर्माला कर्णधारपद देण्याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत. परंतु तो वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व सुरू ठेवणार की हे ही पद सोडून देणार याबाबत चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
विरूगिरी डॉट कॉमच्या एपिसोडच्या एका भागात एका चाहत्याने विचारले की,” विराट कोहलीने वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडावे का? याबाबत बोलताना सेहवाग म्हणाला की, “हा विराटचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु मला नाही वाटत की, त्याने इतर दोन्ही स्वरूपाचे कर्णधारपद सोडावे.जर त्याला एक खेळाडू म्हणून खेळणार असेल तर तो त्याचा निर्णय असेल. मला तर असे वाटते की, भारतीय संघ त्याच्या नेतृत्वाखाली खूप चांगला खेळतोय. एक कर्णधार म्हणून त्याची कामगिरी अद्भुत आहे. त्याने वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडावे की नाही हा त्याचा वैयक्तिक निर्णय असणार आहे.”
तसेच तो म्हणाला की, “मला माहित आहे की, वाईट काळात आपण संघाला साथ दिली पाहिजे, परंतु आपण आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकू शकलो नाहीये. याबाबत भारताने आत्मपरीक्षण करावे. द्विपक्षीय मालिका जिंकणे ही एक गोष्ट आहे, परंतु जेव्हा तुम्ही सलग जागतिक स्पर्धा जिंकता तेव्हाच लोक तुम्हाला लक्षात ठेवतात.”