इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १५ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीला ६ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. हा दिल्लीचा सलग दुसरा पराभव होता. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतही अगदी धीम्यागतीने फलंदाजी करताना दिसला. याबद्दल आता माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने टीका केली आहे.
या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. त्यामुळे दिल्लीला प्रथम फलंदाजी करावी लागली. यावेळी दिल्लीची फलंदाजी फारशी खास झाली नाही. केवळ पृथ्वी शॉने सलामीला आक्रमक खेळ करताना ३४ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर कोणालाही वेगवान खेळ करता आला नाही. पंतने ३६ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. खरंतर पंत आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, यावेळी तो धीम्या गतीने (Slow Batting) खेळताना दिसला.
याबद्दल बोलताना सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला, पंतने (Rishabh Pant) त्याचा नैसर्गिक खेळ बदलायला नको. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, ‘हे पाहा, चिंतेचा विषय हा आहे की, ज्या अंदाजात तो खेळत आहे. हीच काळजीची गोष्ट आहे. बाकी हार-जीत होत राहिल, पण त्याचा अंदाज बदलला आहे. त्याने ३६ चेंडू खेळले. एवढ्या चेंडूत तो ६० धावा बनवतो. जर त्याने २० धावा केल्या असत्या, तर लखनऊला ते महागात पडले असते. मला असं वाटते की, पंतने त्याचा खेळण्याचा अंदाज बदलायला नको.’
सेहवाग पुढे म्हणाला, ‘मैदानात यावे आणि त्याने बिंधास्त खेळावे. ज्यादिवशी तो चालेल, तेव्हा तो सामना जिंकूनच जाईल, हे सर्वांना माहित आहे. पण जर तो विचार करत असेल की, मी कर्णधार आहे आणि मी जबाबदारीने खेळायला हवे, तर मला वाटत नाही की तो या आयपीएलमध्ये यशस्वी होईल.’
‘त्याचा खेळण्याचा पवित्रा असा नाही, की तो जबाबदारीने खेळेल आणि विचार करेल की, मी सामना संपवेल. त्याने यावे आणि चेंडू टप्प्यात आला की एक धाव न घेता त्याला जोरदार फटका मारावा. यापेक्षा त्याने दुसरा कोणताही विचार करू नये,’ असेही सेहवाग म्हणाला.
या सामन्यात दिल्लीने २० षटकांत ३ बाद १४९ धावा केल्या होत्या. लखनऊने त्यांचे १५० धावांचे आव्हान १९.४ षटकांत ४ विकेट्स गमावत १५५ धावा करत पूर्ण केले. लखनऊकडून क्विंटन डी कॉकने ८० धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
चहलसोबत वाईट कृत्य करणाऱ्या खेळाडूवर भडकला सेहवाग; म्हणाला, ‘दारूच्या नशेत त्याच्यासोबत…’