वीरेंद्र सेहवागने जेव्हा पासून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तेव्हापासून तो सर्वात जास्त कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असेल तर ते त्याच ट्विटर अकाउंट. १४० शब्दांची ताकत वीरेंद्र सेहवाग एवढी कुणाला या देशात चांगली माहित नसेल. भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज करतानाही सेहवागने एवढ्याच शब्दात अर्ज केलाय की काय असे वाटते.
भारतीय प्रशिक्षक पदासाठी करण्यात येणाऱ्या अर्जामध्ये सेहवागने फक्त दोन ओळी लिहिल्या आहेत, त्यात सेहवाग लिहितो “मी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब संघाचा प्रशिक्षक आणि मेंटॉर म्हणून काम केले आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडूंबरोबर यापूर्वी मी खेळलो आहे. ”
भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मुदतवाढ न देता बीसीसीआयने नव्याने प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले असून त्यात खुद्द बीसीसीआयनेच सेहवागला अर्ज भरायला लावल्याचे सांगितले जाते. कुंबळेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १३ कसोटीमध्ये १० विजय, १ पराभव पहिला असून दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
भारतीय संघाचे तीन दिग्गज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय प्रशिक्षक पदासाठी इच्छूकांच्या मुलाखती घेणार आहेत. अर्ज करणार्यात टॉम मूडी, लालचंद राजपूत, डोडा गणेश रिचर्ड पायबस यांचे अर्ज आले आहेत.