भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक दिग्गज झाले, ज्यांची मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली आहेत. काही क्रिकेटपटूंचे मुलं अजूनही भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अलीकडेच, राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड चर्चेत होता, ज्यानं प्रथम महाराजा टी20 ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय अंडर-19 संघात निवड झाली.
आता टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याची विनू मांकड ट्रॉफीसाठी दिल्लीच्या अंडर-19 संघात निवड झाली. आर्यवीर 2024-25 च्या देशांतर्गत हंगामात विनू मांकड ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे.
विनू मांकड स्पर्धेला 4 ऑक्टोबरपासून पाँडेचेरी येथे सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी प्रणव पंतला दिल्ली अंडर-19 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तर सार्थक रॉयकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. दक्ष दराल आणि वरुण जेटली यांची यष्टिरक्षक म्हणून निवड झाली आहे. आर्यवीर सेहवाग हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. याशिवाय तो गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे तो आता विनू मांकड ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
विनू मांकड ट्रॉफीसाठी दिल्ली अंडर-19 संघ – प्रणव पंत (कर्णधार), सार्थक राय (उपकर्णधार), आर्यवीर सेहवाग, आदित्य कुमार, धनंजय सिंह, आदित्य भंडारी, लक्ष्य सांगवान, अतुल्य पांडे, दक्ष दराल (यष्टीरक्षक), वंश जेटली (यष्टीरक्षक), सक्षम गेहलोत, ध्रुव कुमार चुम्बक, अमन चौधरी, शांतनु यादव, शुभम दुबे, दिव्यांशु रावत, उद्धव मोहन, लक्ष्मण, परीक्षित सेहरावत
वीरेंद्र सेहवाग भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. सेहवाग 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. सेहवागनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 104 कसोटी सामन्यांमध्ये 8586 धावा केल्या. याशिवाय त्यानं 251 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8273 धावा आणि 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 394 धावा केल्या आहेत. सेहवागनं तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 38 शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा –
आयपीएल 2025 मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम असणार की नाही? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं
आता मनमानी चालणार नाही! ऑक्शननंतर ऐन वेळेवर माघार घेणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका
‘थाला’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनीचा आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा; खास नियम लागू