भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या झंझावाती फलंदाजीचे चाहते आजही जगभरात आहेत. आता सेहवागप्रमाणेच त्याची दोन मुलं, आर्यवीर आणि वेदांत त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या खेळात आपली चमक दाखवायला तयार आहेत.
वीरेंद्र सेहवागचे दोन्ही मुलं क्रिकेटमधील त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे सतत चर्चेत असतात. मोठा मुलगा आर्यवीरनं अलीकडेच कूचबिहार ट्रॉफीमध्ये दिल्ली अंडर-19 संघासाठी 297 धावांची इनिंग खेळून खळबळ उडवून दिली होती. आता त्याचा धाकटा मुलगा वेदांतनं मोठी कामगिरी केली आहे.
वास्तविक, वीरेंद्र सेहवागचा धाकटा मुलगा वेदांत दिल्लीच्या 16 वर्षाखालील संघाचा भाग आहे. वेदांत सध्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत वेदांतनं आपल्या उत्कृष्ट ऑफस्पिन गोलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वेदांतनं विजय मर्चंट ट्रॉफीच्या या मोसमात एकूण 5 सामन्यात 24 बळी घेतले आहे. मुलाच्या या दमदार कामगिरीनंतर वीरेंद्र सेहवागनं सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.
वेदांत हा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. तो गोलंदाजीसोबतच फलंदाजीही करतो. विजय मर्चंट ट्रॉफीमधील शानदार खेळानंतर वीरेंद्र सेहवागनं त्याचा एक व्हिडिओ शेअर करून त्याचं अभिनंदन केलं. सेहवागनं लिहिले, “उत्कृष्ट गोलंदाजी वेदांत सेहवाग. पाच सामन्यात 24 बळी. खूप चांगली कामगिरी!”
वीरेंद्र सेहवाग त्याच्या देखरेखीखाली आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेटचे धडे शिकवत आहे. अपेक्षा आहे की, सेहवागचे दोन्ही मुलं डोमेस्टिक क्रिकेट नंतर लवकरच इंडियन प्रीमियर लीगमध्येही आपला दावा मांडू शकतील. यामध्ये केवळ त्यांच्या वडिलांचं नाव नसून स्वत:ची मेहनत आहे, हे नक्की.
हेही वाचा –
“कोचिंग स्टाफ काय करतोय?”, सिडनीतील पराभवानंतर दिग्गज खेळाडू भडकले
सुनील गावस्कर संतापले! मालिका विजयानंतर ऑस्ट्रेलियानं केला जाहीर अपमान
लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला कसोटी संघात करावे लागतील हे 3 मोठे बदल, रोहित शर्माला वगळणार का?