उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांत झालेल्या रेल्वे अपघातावरून भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने ट्विट करून रल्वे विभागाला आपल्या शैलीत फटकारले आहे. आतापर्यंत गाड्या वेळेवर येत नाहीत, हे पुरेसे नव्हते म्हणून की काय, आता ट्रेन्सला रूळावर राहणेही अवघड जाऊ लागले आहे, असे ट्विट सेहवागने केले. या अपघातांची जबाबदारी कुणीच स्विकारत नाही. निदान भविष्यात तरी मानवी जीवनाचे मोल संबंधितांना कळेल, एवढीच आशा करतो, असेही वीरूने म्हटले आहे.
Being on time was difficult enough,now trains struggling even to be on track.No accountability.Wish human lives valued more#KaifiyatExpress
— Virender Sehwag (@virendersehwag) August 23, 2017
तीन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या खतौली येथे कलिंगा उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रूळांवरून घसरून भीषण अपघात झाला होता. या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला होता तर १२ लोक जखमी झाले होते. त्यानंतर बुधवारी पहाटे औरेया जिल्ह्यात आणखी एक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत डंपरला धडकल्यामुळे कैफियत एक्स्प्रेसचे इंजिन आणि दहा डबे रूळावरून खाली घसरले. यामध्ये तब्बल ७४ प्रवासी जखमी झाले आहेत.
वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या बेधडक फलंदाजी आणि देशातील कोणत्याही गोष्टींवर सडेतोड बोलण्यासाठी ओळखला जातो. सेहवागने भारताकडून १०४ कसोटी, २५१ एकदिवसीय आणि १९ टी२० सामने खेळले आहेत. २वेळा त्रिशतक करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.