चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पहिला कसोटी खेळला जात आहे. इंग्लंडच्या संघाने यजमान भारतासमोर ४२० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने एक गडी गमावून ३९ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा १५ धावांवर जॅक लिचचा बळी ठरला. इंग्लंडच्या संघाने डोंगरासारखे लक्ष्य ठेवल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची आठवण काढत ट्विटरवर ट्रेंड केला आहे.
चाहत्यांनी काढली सेहवागची आठवण
चेन्नई कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला अखेरच्या दिवशी ३८१ धावा कराव्या लागतील. चेन्नईसारख्या खेळपट्टीवर जिथे फिरकी गोलंदाजांना बरीच मदत मिळत आहे, तेथे भारतीय फलंदाजांना धावा करणे कठीण होऊ शकते. अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा सलग दुसऱ्या डावात अपयशी ठरला. म्हणूनच, सोशल मीडियावर चाहत्यांनी सेहवागची आठवण करण्यास सुरुवात केली आणि त्याचे नाव ट्रेंड करायला सुरुवात केली.
सेहवागने केली होती विक्रमी खेळी
ट्विटरवर सेहवागचे नाव ट्रेंडींग होण्यामागे १३ वर्षापूर्वीचे कारण आहे. २००८ मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारतीय दौर्यावर आला होता तेव्हा चेन्नईमध्ये एक कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर ३८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर सेहवागने ६८ चेंडूत ८३ धावांची आक्रमक खेळी करत इंग्लिश गोलंदाजीचा समाचार घेत भारतीय संघाला वेगवान सुरुवात दिली. यानंतर भारतीय संघाने हा सामना जिंकला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने संस्मरणीय शतक ठोकले होते.
भारतासमोर आहे कठीण आव्हान
भारतीय संघाला कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी ३८१ धावा करायच्या आहेत. भारताचे नऊ गडी बाद होणे बाकी आहे. भारताला या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास, कोणत्याही एका खेळाडूला सेहवागसारखी खेळी करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या:
शाबास लंबू! ३०० विकेट्सचा पल्ला गाठणाऱ्या इशांत शर्माचे माजी खेळाडूंनी केले खास अंदाजात कौतुक
यष्टीक्षणावरून रिषभ पंतवर माजी भारतीय खेळाडूची टीका
अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे मोहम्मद अझरुद्दीनचं आयुष्य, वाचा सविस्तर