भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता, पण अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत चांगला पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वचषकातील पुढील गोष्टी सगळ्या जर- तर वर आधारित आहेत. भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत खेळायचे आहे. या मालिकेपूर्वीच त्याची चर्चा जोरात सुरू आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात पदार्पण करणार आहे. टी-२० मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची चर्चा आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने वरिष्ठांऐवजी तरुणांना संधी दिली पाहिजे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.
सेहवाग म्हणाला, ‘इशान किशन, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड हे पुढील विश्वचषकात असतील. या सर्व खेळाडूंना तयार केले जाऊ शकते आणि त्यांना संधी दिली जाऊ शकते. कारण हे सर्व खेळाडू भारतीय संघाचे भविष्य आहेत. उर्वरित वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात यावी जेणेकरुन हे सर्व तरुण खेळाडू मायदेशात होणाऱ्या टी-२० मालिकेत खेळू शकतील. या सर्व खेळाडूंना अनुभव मिळेल आणि पुढील विश्वचषकासाठी स्वत:ला तयार करण्याची त्यांना संधी भेटेल.’
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला टी-२० सामना १७ नोव्हेंबरला, तर शेवटचा कसोटी सामना ३ ते ७ डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. या मालिकेतील सामने जयपूर, रांची, कोलकाता, कानपूर आणि मुंबई येथे होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहनेही सतत बायो बबलमध्ये राहण्याबाबत सांगितले होते. ‘कधी कधी ब्रेक घेतला पाहिजे. कधी कधी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आठवण येते. तुम्ही किमान सहा महिने प्रवासात घालवता. त्यामुळे कधी कधी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मानसिक थकवा देतात, पण जेव्हा तुम्ही मैदानात असता, तेव्हा तुम्ही ते लक्षात घेत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही, स्पर्धेचे सामने कधी खेळवले जातील आणि स्पर्धेचे वेळापत्रक काय असेल. या गोष्टींचे आपण नियंत्रण करू शकत नाही, पण त्यासाठीचे योग्य नियोजन आपण करू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हा’ भारतीय फलंदाज मोडतो विरोधकांचे कंबरडे; माजी पाकिस्तानी दिग्गजाने गायले गोडवे
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”