पुणे: पराभवाच्या छायेतूनही विजयाचा मार्ग कसा शोधला पाहिजे,शेवटपर्यंत संयम राखला तर अशक्य ते शक्य करता येते असे यश मिळविण्याचे अनेक पैलू बुद्धिबळातील विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने दोन दिवसांच्या कार्यशाळेत उलगडले. पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय चॅम्प कोच या कार्यशाळेत आठ राज्यांमधील दोनशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे विश्वनाथन आनंद याच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. देशातील वीस शहरांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये आठ वर्षांखालील गटात आशियाई शालेय विजेता असलेला अक्षय बोरगांवकर, दहा वर्षाखालील आशियाई विजेता ओम कदम या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश होता. आनंद याला या कार्यशाळेत ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे व ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांचे सहकार्य लाभले.
आनंद याने डावाची सुरुवात कशी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते, डावाच्या मध्यास खेळावर कसे नियंत्रण मिळवावे, कॅसलिंग केव्हां करावे, डावाच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये वेळेच्या बंधनात चाली करताना कसा संयम ठेवला पाहिजे, पराभव डोळ्यासमोर दिसत असतानाही शेवटपर्यंत लढत देत किमान बरोबरी कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. काही वेळा खेळाडू विजयाच्या उंबरठ्यावरुन पराभव स्वीकारतात. विजयाची संधी असताना ती शेवटपर्यंत टिकवित डाव कसा जिंकला पाहिजे याचेही तंत्र त्याने उलगडले.
प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध स्वत:ची दोन किंवा तीन प्यादी एकाच रांगेत आल्यानंतर त्यापैकी एकाचे रुपांतर मोहऱ्यात कसे करता येईल, काळ्या मोहरा असतानाही जिद्दीने कसे डाव करायचे असतात याबाबतही या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या शंकांचे निरसन करताना आनंद याने ही कार्यशाळा कंटाळवाणी होणार नाही याचीही काळजी घेतली. सहभागी झालेल्या नवोदित खेळाडूंचे नैपुण्य पाहून तोदेखील आश्चर्यचकित झाला.
या कार्यशाळेतील शिकवणीची शिदोरी घेत अनेक खेळाडू जागतिक स्तरावर अव्वल यश मिळवतील अशी खात्री त्याने व्यक्त केली.
या कार्यशाळेला पर्सिस्टंट सिस्टीम, ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले असून अमनोरा, सारस्वत बँक, कुंटे चेस अकादमी, सॅपीएन्ट वेल्थ, सुजनील, चेसबेस इंडिया, चेस डॉट कॉम, चाणक्य चेस क्लब आणि चितळे डेअरी यांचा पाठिंबा लाभला होता