टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला सुपर १२ फेरीपर्यंतच मजल मारता आली. या स्पर्धेसह भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचाही प्रवास संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जागी माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) द्रविडनंतर अजून एका माजी क्रिकेटपटूला आपल्यासोबत जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण असून बीसीसीआय त्यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) मुख्य प्रशिक्षक अर्थात अध्यक्ष बनवू इच्छित आहे. यापूर्वी द्रविड हे पद सांभाळत होते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, लक्ष्मण भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर एनसीएसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतील. सौराष्ट्रचे माजी फलंदाज सितांशु कोटक यांच्याकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय अ संघाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढे लक्ष्मण हे एनसीएच्या अध्यक्षपदासह भारत अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघांचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळतील.
बीसीसीआयच्या एका जवळच्या सूत्राने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले आहे की, “लक्ष्मण एनसीएचे नवे अध्यक्ष बनण्याचे प्रबळ दावेदार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांची इच्छा आहे की, राहुल द्रविड यांचा कार्यभार पुढे चालवण्यासाठी त्यांच्यासारख्याच मातब्बर क्रिकेटपटूला निवडण्यात यावे. त्यातही द्रविड आणि लक्ष्मण यांचे आपापसांतील संबंध खूप चांगले आहेत. यामुळे भारतीय संघ आणि एनसीएमध्ये चांगला ताळमेळ बनून राहिल.”
पुढे लक्ष्मण यांच्याविषयी बोलताना सूत्राने सांगितले की, “लक्ष्मण यांच्या नियुक्तीसंदर्भातील नियम व अटींची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तत्पूर्वीच लक्ष्मण यांनी एनसीएसोबत आपल्या कल्पना शेअर करण्यास सुरूवात केली आहे.”
द्रविड यांच्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरील निवड प्रकियेप्रमाणेच लक्ष्मण यांचीही नियुक्ती बीसीसीआयला करावी लागणार आहे. एनसीएच्या अध्यक्षपदासाठी बीसीसीआयला सुरुवातीला त्यांच्या संविधानानुसार अर्ज मागवावे लागतील. त्यानंतर अर्जदारांच्या मुलाखतीही घ्याव्या लागतील. याबरोबरच बोर्डाला एनसीएमधील गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठीही अर्ज मागवावे लागतील.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘असा’ राहिलाय ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास, एक वेळा तोंडून हिरावलाय जेतेपदाचा घास
भारतासाठी वाजली धोक्याची घंटा! जखमी कॉनवेच्या जागी ‘या’ धाकड अष्टपैलूची न्यूझीलंड संघात वर्णी