मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला 184 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताच्या या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा तसेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीरला पहिली पसंती नव्हती. त्यांच्या जागी आणखी काही दिग्गजांच्या नावाचा विचार केला जात होता, परंतु त्यानंतर गंभीरचं नाव फायनल झालं.
टीम इंडियासाठी गंभीर हा पहिला पर्याय नव्हता. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयशी संबंधित एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सिडनी कसोटी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली नाही, तर गंभीरच्या अडचणी वाढू शकतात. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी तो कधीच पहिली पसंती नव्हता. मात्र अनेक तडजोडींनंतर त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
बीसीसीआयला गंभीरच्या ऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मणला मुख्य प्रशिक्षक बनवायचं होतं, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. लक्ष्मणसह अन्य माजी विदेशी क्रिकेटपटूंच्या नावांचाही विचार केला गेला. मात्र हे होऊ शकलं नाही. लक्ष्मण हे टीम इंडियाच्या अंडर 19 संघाचे प्रशिक्षक आहेत. याशिवाय ते अनेक दौऱ्यांवर भारताच्या मुख्य संघासोबत गेले आहेत. तसेच त्यांनी बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. टीम इंडियानं पहिली कसोटी 295 धावांनी जिंकली. परंतु यानंतर भारताच्या पराभवाचा सिलसिला सुरू झाला. ॲडलेडमध्ये टीम इंडियाचा 10 विकेट्सनी तर मेलबर्नमध्ये संघाचा 184 धावांनी पराभव झाला. ब्रिस्बेनमध्ये खेळलेला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मात्र या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघावर वरचढ होता.
हेही वाचा –
भारतीय संघात मतभेद! रोहित शर्माच्या कर्णधारपदावर या वरिष्ठ खेळाडूचा डोळा
भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! हेड कोच गौतम गंभीरबाबत रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
रिषभ पंत सिडनी कसोटीतून बाहेर होणार? पाचव्या कसोटीत बदलू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11