सध्या भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडियासाठी पुढचं मोठं आव्हान असेल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं.
भारताला दक्षिण आफ्रिकेत चार टी20 सामने खेळायचे आहेत. तर ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यांसाठी संघांची घोषणा नुकतीच झाली. भारताला 10 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हायचं आहे. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताचे माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील, असं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हीव्हीएस लक्ष्मण आगामी टी20 मालिकेत भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळतील.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती बीसीसीआयनं अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. परंतु एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं ‘क्रिकबझ’ला या संपूर्ण घडामोडीची पुष्टी केली आहे. लक्ष्मण यांच्यासोबत एनसीएचे कर्मचारी आणि इतर प्रशिक्षकही दक्षिण आफ्रिकेला जाणार असून त्यात साईराज बहुतुले, हृषीकेश कानिटकर आणि सुभदीप घोष यांचा समावेश असेल. या तिघांनी नुकत्याच ओमानमध्ये खेळल्या गेलेल्या इमर्जिंग आशिया कपमध्ये भारत ‘अ’ संघासोबत काम केलं होतं.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेचा निर्णय यापूर्वी झाला नव्हता परंतु काही काळापूर्वी त्याची घोषणा करण्यात आली होती. या कारणावरून टीकाही होत आहे, कारण हा दौरा भारताच्या देशांतर्गत क्रिकेटच्या मध्यावर होणार आहे. याच कारणामुळे अनेक महत्त्वाचे खेळाडू काही काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाहीत. टीम इंडिया ८ नोव्हेंबरपासून दौऱ्याला सुरुवात करणार आहे. यानंतर पुढील तीन सामने अनुक्रमे 10, 13 आणि 15 नोव्हेंबरला होणार आहेत.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार व्याशक, आवेश खान, यश दयाल
हेही वाचा –
कोच गॅरी कर्स्टनचं पाकिस्तान संघाशी बिनसलं, लवकरच सोडणार साथ
जर टीम इंडिया बाहेर पडली तर कोणते दोन संघ WTC फायनल खेळतील? हे आहेत दावेदार
इमर्जिंग आशिया कपला मिळाला नवा चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव