दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बुधवारी (१३ ऑक्टोबर) अत्यंत चुरशीचा सामना पाहायला भेटला. दिल्लीने दिलेल्या निर्धारित १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना शेवटी शेवटी केकेआरची देखील तारांबळ उडाली होती. मात्र, शेवटी राहुल त्रिपाठीने अखेरच्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर षटकार मारून केकेआरला विजय मिळवून दिला.
व्यंकटेश अय्यरने शारजाच्या कठीण खेळपट्टीवर भक्कम फलंदाजी करताना केवळ अर्धशतकच केले नाही, तर कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयातही मोठे योगदान दिले. व्यंकटेशने विजयानंतर म्हटले आहे की फ्रँचायझीने त्याला वेगवान खेळ खेळण्याची पूर्ण परवानगी दिली आहे.
व्यंकटेशने या सामन्यात ४१ चेंडूत ५५ धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. व्यंकटेश म्हणाला, “संघासाठी मला जे करायला सांगितले गेले आहे ते मी करत आलो आहे. आम्ही जिंकलो याचा मला खूप आनंद झाला आहे. जेव्हा मी खेळपट्टीवर आलो, तेव्हा मला ज्या पद्धतीने खेळायचे होते तसे मी खेळलो. मी संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे, ज्यांनी मला ही संधी दिली.”
आयपीएल व्यासपीठाबाबत व्यंकटेश म्हणाला, ‘”हे खेळण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. मला वाटते की, गेल्या काही सामन्यांमध्ये मी स्वत: ला थोडे मर्यादित करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण, मला शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून रहायचे होते. पण नंतर मला समजले की हा माझा खेळ नाही. मी सध्या जुने विचार सोडून नवे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे.”
सलामीवीर शुबमन गिलबाबत अय्यर म्हणाला, “गिल खूप चांगला खेळाडू आहे आणि आम्ही एकमेकांसोबत चांगले खेळतो. मी आज सकाळी बातमी ऐकली की, टी२० विश्वचषकासाठी मला भारतीय बायो-बबलमध्ये सामील होण्यास सांगितले जात आहे, पण माझे संपूर्ण लक्ष दिल्लीसोबत होणाऱ्या सामन्याकडेच होते.”
व्यंकटेशने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. मात्र, केकेआरचे फलंदाज व्यंकटेश बाद झाल्यानंतर कठीण खेळपट्टीवर तग धरू शकले नाही. केकेआरच्या ७ धावांमध्ये ६ विकेट पडल्या. शेवटच्या दोन चेंडूंवर ६ धावांची गरज होती, तेव्हा राहुल त्रिपाठीने षटकार मारून व्यंकटेशची अर्धशतकी खेळी व्यर्थ जाऊ दिली नाही.