जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरु व्हायला आता केवळ एका दिवसाचा अवधी बाकी आहे. उद्यापासून म्हणजेच १८ जूनपासून हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटच्या मैदानावर खेळवला जाईल. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात कसोटी क्रिकेटचा सर्वोच्च किताब पटकावण्यासाठी आमनेसामने असतील.
या सामन्यात भारतीय संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह उतरणार, याविषयी आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेक विश्लेषक आणि क्रिकेट जाणकारांनी संभाव्य संघाची भाकीते केली आहेत. आता भारताचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी देखील भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
‘असा’ आहे व्यंकटेश प्रसाद यांनी निवडलेला संघ
व्यंकटेश प्रसाद यांनी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची सलामीच्या जोडीसाठी निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अपेक्षेप्रमाणे त्यांनी चेतेश्वर पुजाराची निवड केली आहे. मधल्या फळीत चौथ्या क्रमांकासाठी कर्णधार विराट कोहली तर पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आहे. सहाव्या क्रमांकावर यष्टीरक्षक रिषभ पंतला प्रसाद यांनी स्थान दिले आहे. प्रसाद यांच्या मते रिषभ पंत भारतीय संघाचा ‘एक्स फॅक्टर’ सिद्ध होऊ शकतो.
गोलंदाजी आक्रमणाकडे पाहायचे झाल्यास व्यंकटेश प्रसाद यांनी संघात अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना स्थान दिले आहे. प्रसाद यांच्या मते जडेजा आणि अश्विन हे दोघेही संघासाठी उपयुक्त धावा करू शकतात. तर वेगवान गोलंदाजांमध्ये त्यांनी मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांची निवड केली आहे. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली असली तरी प्रसाद यांनी अनुभवाला प्राधान्य दिले आहे.
व्यंकटेश प्रसाद यांनी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! ऑस्ट्रेलियन खेळाडू सोडणार आयपीएल? वाचा काय म्हणाले मुख्य निवडकर्ता
पदार्पणाच्या सामन्यातच चमकली ही भारतीय फिरकीपटू, दिवंगत वडिलांना समर्पित केली कामगिरी
ही गोष्ट केली तर भारताकडून टी२० विश्वचषकात नक्कीच खेळणार, कुलदीप यादवने व्यक्त केला विश्वास