सध्या क्रिकेटजगतात विविध व्यावसायिक टी२० लीग नव्याने सुरू होत आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत एक नवी कोरी टी२० लीग खेळली जाणार आहे. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिरातीतही (युएई) त्याचवेळी टी२० लीग सुरू होईल. युएईतील या लीगसाठी आत्तापासूनच अनेक बड्या खेळाडूंशी बातचीत करण्यास संघाच्या संघमालकांनी सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
वॉर्नर खेळणार युएईत?
पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात युएईत होणाऱ्या युएई टी२० लीगमध्ये सहा संघ सहभागी होतील. ही लीग आयपीएलनंतरची दुसरी सर्वात श्रीमंत लीग असणार आहे असे सांगितले जातेय. माध्यमातील वृत्तानुसार, या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना इतर लीगच्या तुलनेत अधिक रक्कम देण्यात येईल. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंची निवड ड्राफ्ट पद्धतीने होणार आहे. मात्र, त्याआधी प्रत्येक फ्रेंचाईजीला चार खेळाडू परस्पर करारबद्ध करता येऊ शकतात असे सांगितले जातेय. त्याचनुसार एका फ्रेंचाईजीने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला तीन वर्षासाठी तब्बल १७ कोटींपेक्षा जास्तच्या रकमेची ऑफर दिली आहे. ही फ्रेंचाईजी दुबईस्थित असल्याचे सांगितले जात आहे. याच कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग खेळली जाणार आहे. वॉर्नर ती लीग सोडून युएईत खेळू शकतो. यासाठी त्याला केवळ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज लागेल. परंतु, याबाबत वॉर्नरने कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य केले नाही.
मोठ्या पातळीवर होणार लीग
अमिराती क्रिकेट बोर्डने जून २०२२ मध्ये घोषित केले होते की, इंटरनॅशनल लीग टी२० स्पर्धेचा पहिला हंगाम ६ जानेवारी २०२३ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत सहा संघांमध्ये अबुधाबी, दुबई आणि शारजाह स्टेडियममध्ये ३४ सामने खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तुफान फॉर्मात अससेल्या आझमची ‘या’ नवख्या गोलंदाजापुढे होतेय सिट्टी पिट्टी गुल, बघा कोण आहे तो?
त्रिनिदादमध्ये भारताचे जास्त सामने घेतल्याने संतापला कॅरेबियन दिग्गज; म्हणाला, “काय गरज होती ?”