श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशवर ४ विकेट्सने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा युवा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला उत्कृष्ट गोलंदाजीसाठी मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकावीर पुरस्कारामुळे त्याने क्रिकेटमध्ये एक खास इतिहास रचला. तो मालिकावीर पुरस्कार मिळवणारा आत्तापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. हा पुरस्कार मिळाला तेव्हा सुंदरचे वय १८ वर्षे आणि १६४ दिवस एवढे होते.
त्याने निदाहास ट्रॉफीमध्ये ५ सामन्यांमध्ये ८ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने यासाठी फक्त ११४ धावा दिल्या आहेत.
सुंदरच्या आधी हा विक्रम पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसच्या नावावर होता. त्याला १९९० मध्ये ऑस्ट्रल-आशिया कपसाठी मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. यावेळी युनूसचे वय १८ वर्षे १६९ दिवस इतके होते.
सुंदरने भारताकडून १३ डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मोहालीत वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. त्याने भारताकडून आत्तापर्यंत हा एकच वनडे सामना खेळला आहे. तसेच त्याने ६ टी २० सामने खेळले आहेत. यात त्याने ९ विकेट्स घेतल्या आहेत.
मालिकावीर पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण खेळाडू:
वॉशिंग्टन सुंदर: १८ वर्षे १६४ दिवस (निदाहास ट्रॉफी,२०१८)*
वकार युनूस: १८ वर्षे १६९ दिवस (ऑस्ट्रल-आशिया कप,१९९०)
नरेंद्र हिरवानी: १९ वर्षे १६६ दिवस (शारजाह कप, १९८८)