पुढच्या महिन्यात भारताला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचं आहे. त्याआधी भारत न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. त्याचवेळी देशात रणजी ट्रॉफीही खेळली जात आहे. या रणजी ट्रॉफीत तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरनं दिल्लीविरुद्ध दमदार शतक झळकावलं. विशेष म्हणजे, सुंदर या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या शतकासह त्यानं बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी आपला दावा मजबूत केला आहे.
दिल्लीविरुद्ध 168 धावांवर पहिली विकेट गमावणाऱ्या तामिळनाडूनं सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय घेतला. सुंदर पहिल्या दिवशी नाबाद 96 धावा करून माघारी परतला होता. त्यानं दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपलं शतक पूर्ण केलं. सुंदरचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे दुसरं शतक आहे. त्यानं साई सुदर्शन (213) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 232 धावांची मोठी भागीदारी केली.
वॉशिंग्टन सुंदरनं 178 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकारासह आपलं शतक पूर्ण केलं. पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी करणारा सुंदर दुसऱ्या दिवशीही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. दुसऱ्या दिवशी अल्पावधीतच दोन विकेट पडल्या असूनही सुंदरनं 150 धावांकडे वाटचाल केली आहे.
गेल्या वेळी जेव्हा भारतानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत सलग दुसऱ्यांदा पराभूत केलं होतं, तेव्हा सुंदर देखील त्या संघाचा एक भाग होता. मालिकेतील शेवटच्या गाबा कसोटीत त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती. त्या सामन्यातील पहिल्या डावात भारतानं 186 धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. तेव्हा सुंदरनं शार्दुल ठाकूर (67) सोबत सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात त्यानं 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या डावातही त्यानं 29 चेंडूत 22 धावांची जलद खेळी खेळली होती. या कसोटीत सुंदरनं गोलंदाजीतही कमाल करत एकूण 4 विकेट घेतल्या होत्या.
अशा स्थितीत आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सुंदरनं आपल्या या कामगिरीनं पुन्हा एकदा भारतीय संघासाठी दावा ठोकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. सुंदर जर रणजी ट्रॉफीमध्ये अशीच कामगिरी करत राहिला, तर त्याची निश्चितच या दौऱ्यासाठी निवड होऊ शकते.
हेही वाचा –
सरफराजनंतर श्रेयस अय्यरचा धमाका! तुफानी शतक ठोकून दिलं निवडकर्त्यांना उत्तर
एमएस धोनीचा हा विक्रम मोडीत काढत रिषभ पंत बनला नंबर-1 कीपर, न्यूझीलंडचे धाबे दणाणले
हेल्मेट काढलं, मैदानाभर धावला…सरफराजचं सेंच्युरी सेलिब्रेशन एकदा पाहाच; कोहली-रोहितनंही दिलं स्टँडिंग ओव्हेशन!