पाकिस्तान संघात एकाहून एक सरस विस्फोटक फलंदाजांचा भरणा आहे. कर्णधार बाबर आझम, यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान या जोडीची आक्रमक फलंदाजी सर्वांनाच परिचित आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य सामन्यातही या फलंदाजांची बॅट तळपली. त्यांच्याव्यतिरिक्त फखर जमान याने या महत्त्वपूर्ण सामन्यात झंझावती फलंदाजी करत वाह वाह लुटली. त्याच्या विस्फोटक खेळीदरम्यान त्याने एक असाही शॉट मारला, ज्यापासून मैदानी पंचांनी स्वत:ला कसेबसे वाचवले. उपांत्य सामन्यातील या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
हा प्रसंग पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना १८ व्या षटकात घडला. ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क हे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने या षटकातील पाचवा चेंडू लो फुलटॉस टाकला आणि यावर फखर जमानने खतरनाक शॉट खेळला. त्याने मारलेल्या या फटक्याचा चेंडू सरळ स्ट्रेट बाउंड्रीच्या दिशेने गेला. त्याचा हा चेंडू इतक्या वेगाने गेला की, अगदी गोलंदाज स्टार्कनेही चेंडू न पकडता हात मागे वळवला.
यावेळी मैदानी पंच ख्रिस गॅफेन्सी नॉन स्ट्राईककडील यष्टीपुढे उभे होते. आपल्या दिशेने चेंडू येत असल्याचे पाहून ते सुद्धा त्वरित खाली वाकले. यामुळे अगदी थोडक्यात त्या चेंडूपासून त्यांचे डोके वाचले. यादरम्यान त्यांचा तोल गेल्यामुळे ते मैदानवरच खाली कोसळले. परंतु त्या वेगवान चेंडूपासून स्वतला वाचवण्यात मात्र ते यशस्वी ठरले.
फखर जमानच्या त्या शॉटपासून पंचांनी स्वतला वाचवले खरे परंतु त्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्टपणे दिसत होती. समालोचकांनीही पुढे थोडा वेळ त्या शॉटवर चर्चा केली. फलंदाज आणि यष्टीरक्षकांप्रमाणे पंचांनाही चेंडूपासून स्वतला वाचवण्यासाटी हेल्मेटची आवश्यकता असल्याचे समालोचक म्हणाले.
https://twitter.com/faheem_kpk/status/1458819726226907143?s=20
https://twitter.com/kudaville/status/1458820463895982081?s=20
या सामन्यात फखर जमान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. पाकिस्तानची सलामी जोडी बाद झाल्यानंतर त्याने डावाखेर नाबाद राहत ३२ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली होती. त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला १७५ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु पाकिस्तानचे गोलंदाज या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरले. परिणामी १ षटक आणि ५ विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: मॅथ्यू वेडचे ‘ते’ ३ सलग षटकार, ज्यामुळे पाकिस्तानच्या हातून निसटले फायनलचे तिकीट
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, विराट नव्हे तर ‘हा’ असेल कर्णधार
सेमी फायनल गमावली, पण पाकिस्तानच्या रिझवानचा ‘भीमपराक्रम’; टी२०त एका वर्षात कुटल्या १००० धावा






