इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या रॉयल लंडन वनडे चषक २०२२ मध्ये दररोज काही-ना-काही मनोरंजक घटना पाहायला मिळते. शुक्रवारी (१९ ऑगस्ट) या स्पर्धेत मिडलसेक्स आणि वार्विकशायर संघांचा आमना सामना झाला. या सामन्यात मिडलसेक्सकडून कर्णधार स्टिफन एक्सिनाझी याने शानदार शतकी खेळी केली. परंतु या खेळीनंतर तो अत्यंत दुर्देवीरित्या धावबाद झाला. रॉयल लंडन वनडे चषकाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर या क्षणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
खरे तर, स्टिफन आरामात त्याच्या शतकी खेळीला दीडशतकात रुपांतरित करू शकला असता. परंतु संघ सहकारी आणि शतकवीर सॅम रॉबसन याच्यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली. रॉबसनने स्वत: स्टिफनला बाद केले आहे.
त्याचे झाले असे की, वार्विकशायर संघाचा गोलंदाज ओलिव्हियर हॅनॉन डालबी याने डावातील ३९ व्या षटकातील तिसरा चेंडू खूप पुढे टाकला. ज्यावर फलंदाज रॉबसनने सरळ फटका मारला. रॉबसनच्या बॅटला लागून चेंडू इतक्या जोराने पुढे गेला होता की, तो नक्कीच चौकारासाठी सीमारेषेपार जाईल असे वाटत होते. परंतु झाले भलतेच.
रॉबसनच्या बॅटला लागून सरळ दिशेने गेलेला चेंडू गोलंदाज ओलिव्हियरच्या बोटांना लागला आणि चेंडूने दिशाच बदलली. हा चेंडू थेट नॉन स्ट्राईकवरील यष्ट्यांना जाऊन लागला. दुर्देवाने यावेळी स्टिफन धाव घेण्यासाठी क्रिजच्या पुढे निघून गेला होता. त्यामुळे पंचांनी त्याला धावबाद घोषित केले. अशाप्रकारे स्टिफनला दुर्देवीरित्या आपली विकेट गमवावी लागली.
Can you believe it? ????
Is this the only way to get Eskinazi out? ???? #RLC22 pic.twitter.com/h8bSspiMS0
— Metro Bank One Day Cup (@onedaycup) August 19, 2022
दरम्यान या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना मिडलसेक्स संघाकडून २ फलंदाजांनी शतके केली. स्टिफनने १०२ धावा केल्या. तसेच रॉबसननेही १११ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या शतकांच्या जोरावर मिडलसेक्सने वार्विकशायरला ३७५ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वार्विकशायरचा संघ २४६ धावांवरच सर्वबाद झाला. परिणामी त्यांनी १२८ धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना गमावला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सोलापूर ते नागालँड अन् थेट टीम इंडिया असा प्रवास करणाऱ्या किरणची रोमहर्षक कहाणी, एकदा वाचाच
सर्व सहभागी संघ ते वेळापत्रक, एकाच क्लिकवर जाणून घ्या एशिया कप २०२२ बद्दल सर्वकाही
Second ODI: मॅच विनिंग प्रदर्शनानंतरही दीपक चाहरला का बसवलं बाकावर? कारण आले पुढे




