इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) सांगता झाली. चेन्नई सुपर किंग्सने या हंगामाचे विजेतेपद जिंकत चौथ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. आता यानंतर टी२० विश्वचषकाचे पडघम वाजले आहेत. रविवारपासून(१७ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकाला संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माजी कर्णधार एमएस धोनीला या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमण्यात आले आहे. याबद्दलही विराटने आपले मत मांडले आहे.
विराट धोनीबद्दल बोलताना म्हणाला, ‘त्याला खूप अनुभव आहे. तो स्वतः या वातावरणात येण्यास उत्सुक आहे. तो तेव्हापासून आमचा मार्गदर्शक राहिला आहे, जेव्हापासून आम्ही आमची कारकीर्द सुरू केली आहे. आणि संघात असेपर्यंत त्यानी ही भूमिका उत्तमरित्या निभावली आहे.
विराट पुढे म्हणाला, ‘त्या युवा खेळाडूंनाही खूप फायदा होईल, जे पहिल्यांदा इतकी मोठी स्पर्धा खेळणार आहेत. एखाद्या गुंतागुंतीच्या समस्येविरुद्ध त्याच्या दृष्टीकोनाने आणि सरावादरम्यान त्याने दिलेल्या सल्ल्याने आमचा खेळ किमान एक ते दोन टक्क्यांनी तरी सुधारेल. त्याच्या उपस्थितीमुळे आम्ही खूप आनंदी आहोत. त्याच्या उपस्थितीमुळे केवळ उत्साह वाढणार नाही, तर आत्मविश्वास आणखी वाढेल.’
विराट असेही म्हटला की धोनीच्या अनुभवाचा फायदा घेईल. याशिवाय सध्या चर्चित असलेला विषय म्हणजे भारतीय संघाचा भविष्यातील प्रशिक्षक. सध्या असे म्हटले जात आहे की राहुल द्रविड ही भूमिका स्वीकारण्याची दाट शक्यता आहे.
याबद्दल विराट म्हणाला, ‘मला याबद्दल काही कल्पना नाही की काय सुरु आहे. याबद्दल अजून कोणाशी चर्चा झालेली नाही.’
सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपणार आहे. त्यानंतर ते ही जबाबदारी पुन्हा स्वीकारणार नाहीत. त्यामुळे भारताला नवा प्रशिक्षक मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लहान मुलाचा डान्स पाहून विराट कोहली थक्क, व्हिडिओ लिंक शेअर करत लिहिला भावुक संदेश
Video: आयपीएल ट्रॉफी घेऊन ऋतुराजची हॉटेलमध्ये दिमाखात एन्ट्री, सीएसकेने केला विजयी जल्लोष
चेन्नईला विजेतेपद जिंकून देणारे प्रशिक्षक आता टी२० विश्वचषकात बनवणार धोनीला हरवण्याचा प्लॅन