भारतीय महिला क्रिकेट संघाने बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता शनिवारी (०६ ऑगस्ट) भारत पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडशी भिडणार आहे. ऍजबस्टनच्या मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांनी अंतिम एकादशमध्ये काही बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भारतीय महिला संघ ((Indian Women Cricket Team) एक प्रगतशील संघ असल्याचे सांगत येत्या काही सामन्यांमध्ये संघात विभिन्न संयोजन पाहायला मिळतील, असे संकेत पोवार (Head Coach Ramesh Powar) यांनी दिले आहेत.
उपांत्य सामन्याच्या पूर्वसंध्येला पोवार म्हणाले की, “आम्ही एक प्रगतशील संघ आहोत, ज्यामुळे आमच्या प्रक्रियेत आणि योजनांमध्ये सातत्याने बदल होतील. आम्ही संघाकडून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”
बार्बाडोसविरुद्धच्या ‘करा वा मरा’ सामन्यात जेमिमाह रोड्रिगेजने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५६ धावांची खेळी केली होती. तिच्या याच खेळीने भारतीय संघाला बार्बाडोसवर १०० धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना पोवार म्हणाले की, “आम्हाला असे वाटले की, जेमी यासाठी तयार होती. कारण ती इंग्लंडमध्ये काही खेळली होती. त्यामुळे आम्ही जोखिम घेण्याचा विचार केला होता.”
“जेव्हा तुम्ही अशा मोठ्या स्पर्धांमध्ये येता, तेव्हा तुम्ही खेळाडूंसोबत पूर्णपणे तयार असता. तुमच्याकडे सर्व १५ खेळाडू उपस्थित असतात. ही द्विपक्षीय मालिका नाही, जिथे तुम्ही एका खेळाडूलाच आजमावून पाहू शकता आणि बघता की तो काय करू शकतो. ही एक मोठी स्पर्धा आहे आणि आमच्याकडे जितक्या खेळाडू उपलब्ध आहे, आम्ही त्यांचा वापर करू इच्छित आहोत”, असेही पोवार पुढे म्हणाले.
We thought Jemimah is ready to bat at No. 3. She has the experience of playing in England and we felt we must promote her in the batting order: Head Coach @imrameshpowar #INDvENG pic.twitter.com/7gKHf4vWv5
— BCCI Women (@BCCIWomen) August 5, 2022
दरम्यान भारतीय संघाला त्यांच्या पहिल्याच कॉमनवेल्थ सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सने हा सामना जिंकला होता. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि ८ विकेट्सने सामना जिंकत आपले खाते उघडले. त्यानंतर बार्बाडोसवर एकतर्फी विजय मिळवत भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे.
आता उपांत्य सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारतीय संघाला अंतिम सामन्यात धडक मारता येईल की नाही, हे पाहावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
BREAKING: एका तासात कुस्तीत भारताला तीन गोल्ड; बजरंग-साक्षीपाठोपाठ दीपक पुनियाने रचला इतिहास