सध्या बेन स्टोक्स विषयी विविध स्तरावर अनेक विधाने केली जात आहेत. त्यातच आता इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीची भर पडली आहे. तो स्टोक्स विषयी बोलताना म्हणाला “आपल्या सगळ्यांनाच माहित आहे स्टोक्स चांगला खेळाडू आहे आणि तो आमच्याकडे असणाऱ्या मुख्य खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे तो संघात असणं मोलाचं असेल पण बघुयात पुढे काय होतंय. जर तो संघात नसला तर आम्हाला त्याच्या शिवाय चांगला खेळ करावा लागेल, पण मला असं वाटतंय की तरीही आम्ही जिंकू शकतो.”
स्टोक्स संघात नसेल तर कदाचित मोईन अलीला ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागेल. सध्या मोईन अली ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. त्यावर अली म्हणाला की “सध्या तरी मी ८ व्या क्रमांकावर खेळतो पण जर मला ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करायला सांगितली तर मला वाटतं तिथे मी चांगला खेळ करण्यास सक्षम आहे. आणि मला अशा आहे की मी ७व्या क्रमांकावर ऑस्ट्रलिया विरुद्ध चांगला खेळू शकेन. आशा आहे की आम्ही मालिका जिंकू.”
सोमवारी बेन स्टोक्सला नाईटक्लबमध्ये मारहाण केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्याला सोडूनही देण्यात आले होते. परंतु अॅशेस मालिके साठीच्या इंग्लंड संघात त्याला उपकर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले नाही.
अजूनही त्या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने स्टोक्सवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे त्याच्या अॅशेस मालिकेच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे.
यावर्षीची अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियात होणार असून २३ नोव्हेंबर पासून या मालिकेला सुरवात होणार आहे.