आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव काल (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे पार पडला. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. या लिलावाद्वारे सर्वांनी आपल्या संघातील रिक्त जागा भरण्यावर जोर दिला. सनरायझर्स हैदराबाद संघाने देखील या लिलावात तीन खेळाडू खरेदी केले. मात्र, आवश्यक असलेले महत्वाचे खेळाडू न मिळाल्याची खंत सनरायझर्सचा मेंटॉर व्हीव्हीएस लक्ष्मणने बोलून दाखवली.
खेळाडूंवर लागली कोट्यावधींची बोली
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटी रुपयांची बोली त्याच्यावर लावली. न्यूझीलंडचा युवा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन याला आरसीबीने १५ कोटी रुपयांना खरेदी केले. भारतीय खेळाडूंमध्ये कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णप्पा गौतम ९.२५ कोठे रुपये मिळवून चेन्नईच्या ताफ्यात सामील झाला.
लक्ष्मणने दिली प्रतिक्रिया
सनरायझर्स हैदराबादचा मेंटॉर व्हीव्हीएस लक्ष्मण याने या लिलावानंतर प्रतिक्रिया दिली. आपल्याला हवे असलेले प्रमुख क्रिकेटपटू कमी रकमेअभावी मिळाली नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. लक्ष्मण म्हणाला, “आम्हाला ग्लेन मॅक्सवेल व कृष्णप्पा गौतम आमच्या संघात हवे होते. मात्र, त्या दोघांचीही बोली अपेक्षेपेक्षा जास्त गेल्याने त्यांना आम्ही सहभागी करू शकलो नाही. तरीही, त्यानंतर मिळालेले खेळाडू देखील तितकेच प्रतिभावंत आहेत.”
मॅक्सवेल व गौतमला लागली मोठी बोली
सनरायझर्स हैदराबाद संघाकडे या लिलावासाठी १०.७५ कोटी इतकी रक्कम शिल्लक होती. मॅक्सवेलला १४.२५ कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. तर, चेन्नई सुपर किंग्सने गौतमला ९.२५ कोटी रुपये देत पुढील हंगामासाठी आपल्या संघात पाचारण केले.
सनरायझर्स हैदराबाद संघाने उपलब्ध असलेल्या रकमेमध्ये भारताचा अनुभवी फलंदाज केदार जाधव, अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान व कर्नाटकचा अष्टपैलू जगदीश सुचित यांना खरेदी केले.
महत्वाच्या बातम्या:
कोलकाता नाईट रायडर्सच्या अष्टपैलूचा धक्कादायक निर्णय, आयपीएलसाठी घेणार कसोटी मालिकेतून माघार