भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. दोन्ही संघ केवळ स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेगवेगळ्या वेळी भारताविरुद्ध मालिका खेळण्याचा प्रस्ताव दिला आहे, परंतु प्रत्येक वेळी बीसीसीआयने तो नाकारला आहे. आर्थिकदृष्ट्या हे सामने खूप फायद्याचे ठरतात, तरीसुद्धा बीसीसीआय आपली भूमिका बदलण्यास तयार नाही.
द्विपक्षीय मालिकांव्यतिरिक्त भारत-पाकिस्तान सामन्यांबाबतच्या अडचणी स्पर्धांमध्येही संपलेल्या नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने पाकिस्तानला जाऊन खेळण्यास नकार दिला होता. आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावरदेखील अनिश्चिततेची तलवार लटकत आहे. PCB चेअरमन मोहसिन नकवी यांनी नुकतीच भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंधांवर भाष्य करत बीसीसीआयला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले.
लाहोरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मोहसिन नकवी म्हणाले, “माझ्या मते आम्ही अगदी स्पष्ट आहोत. कधीही चर्चा झाली, तरी ती भारतासोबत समान पातळीवरच होईल. आता आम्ही चर्चेसाठी भीक मागणार नाही. तो काळ संपला आहे आणि आता जे काही होईल ते समानतेच्या आधारावरच होईल.”
भारतीय सरकारने नुकतेच हे स्पष्ट केले होते की पाकिस्तानसोबत भविष्यात टीम इंडियाची कोणतीही द्विपक्षीय मालिका होणार नाही. दोन्ही संघ फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच खेळताना दिसतील. शेवटची मालिका 2012-13 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात खेळली गेली होती. अलीकडेच दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढला आहे आणि त्यामुळे आता मालिका आयोजित करण्याचा काही उपयोग राहिलेला नाही. असो, आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे. या स्पर्धेत 14 सप्टेंबर 2025 रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. पाहावे लागेल की हा सामना बहिष्कृत केला जातो का, की दोन्ही संघ खरोखरच आमनेसामने भिडतात.






