आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या २०२१-२०२२ हंगामाला बुधवारी (२ जून) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याने सुरुवात झाली. तत्पूर्वी हंगामातील अखेरची वनडे मालिका २८ मे रोजी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यादरम्यान समाप्त झाली. बांगलादेशने मालिकेत २-१ असा विजय मिळविला. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच वनडेमधील सांघिक व खेळाडूंची क्रमवारी अद्ययावत केली आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत बदल नाही
आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत पहिल्या दहामध्ये बदल झाला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानी कायम असून, भारताचा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान कायम राखले आहे. रॉस टेलर व ऍरॉन फिंच अव्वल पाचमधील इतर फलंदाज आहेत. बांगलादेशविरुद्ध दमदार कामगिरी करणारा श्रीलंकेचा कर्णधार कुसल परेरा १३ स्थानांच्या प्रगतीसह ४२ व्या क्रमांकावर आला.
गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह जैसे थे
वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानी कायम आहे. न्यूझीलंडचा अनुभवी ट्रेंट बोल्ट याने आपले अव्वलस्थान कायम राखले असून, बांगलादेशचा युवा फिरकीपटू मेहदी हसन आणि अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान हे दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर काबीज आहेत. तेराव्या क्रमांकावर असलेला भुवनेश्वर कुमार भारताचा दुसरा सर्वोत्तम गोलंदाज आहे. श्रीलंकेचा दुष्मंता चमिरा २७ स्थानांच्या प्रगतीसह ३३ व्या क्रमांकावर आला.
सांघिक क्रमवारीत न्यूझीलंड प्रथम
वनडे क्रिकेटमधील सांघिक क्रमवारीत १२१ रेटिंग गुणांसह न्यूझीलंड प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व भारताचा क्रमांक लागतो. या दोन्ही संघांचे रेटिंग गुण अनुक्रमे ११८ व ११५ असे आहेत. पहिल्या पाचमध्ये इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांचादेखील समावेश होतो. पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडीज, श्रीलंका व अफगाणिस्तान हे ‘टॉप टेन’ मधील इतर संघ आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर जुळ्या बंधूंनी गाजवले होते अधिराज्य; साजरा करत आहेत ५६ वा वाढदिवस
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारे फलंदाज, अव्वल स्थानी आहे ‘हा’ दिग्गज
कसोटी जर्सी भारतीय खेळाडूंना वाटप करताना का घातले होते मितालीने पॅड्स, स्वत:च केला खुलासा