पुणे । महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके जिंकून दुहेरी धमाका केला. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या स्नेहल भोंगळे हिने ८७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ६८ किलो वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये तिने ९२ किलो वजन उचलताना स्वत: नोंदविलेला ८७ किलो हा विक्रम मोडला. तिने एकूण १६० किलो वजन उचलले. उत्तरप्रदेशची शिवांगी सिंग (१५४ किलो) व केरळची अमृथा जयन (१३७ किलो) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळविले.
महाराष्ट्राच्या अश्विनी मळगे हिने १७ वषार्खालील मुलींच्या ८७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ८० किलो वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये तिने १०४ किलो वजन उचलताना स्वत: नोंदविलेला १०३ किलो हा विक्रम मोडला. तिने एकूण १८४ किलो वजन उचलले. कर्नाटकची भाविशा (१८० किलो) व केरळची अॅन मारिया (१६७ किलो) यांना अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळाले.
मुष्टीयुद्ध खेळात देविका घोरपडे व लक्ष्मी पाटील यांचे पदक निश्चित
महाराष्ट्राच्या देविका घोरपडे व लक्ष्मी पाटील यांनी मुष्टीयुद्धातील उपांत्य फेरीत स्थान मिळविले आणि पदक निश्चित केले. देविका हिने १७ वर्षाखालील मुलींच्या ४६ किलो वजनी गटात उपांत्य फेरी निश्चित केली. तिने गोव्याच्या आरती चौहान हिला ५-० असे हरविले. देविका ही पुण्यात आॅलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलींच्याच या वयोगटात लक्ष्मी पाटील हिने मध्यप्रदेशच्या आयुषी अवस्थी हिच्यावर ५-० असा विजय मिळविला. तिने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. तिच्या प्रभावी खेळापुढे आयुषी हिला फारसा बचाव करता आला नाही. महाराष्ट्राच्या बिश्वाामित्रा चोंगथोम याने ४१ किलो गटात पंजाबच्या अभिषेक सिंग याच्यावर ४-१ अशी मात केली. ५९ किलो गटात महाराष्ट्राच्या शोईकोर्म सिंग याने दिल्लीच्या यश कौशिक याचा ५-० असा दणदणीत पराभव केला. मात्र राओबासिंग या महाराष्ट्राच्या खेळाडूला उत्तराखंडच्या संजयकुमार याच्याकडून ०-५ असा पराभव स्वीकारावा लागला. ५० किलो गटात महाराष्ट्राच्या येफाबा मितेई याने अपराजित्व राखताना पंजाबच्या भिंदरसिंग याला ५-० असे पराभूत केले. त्याचा सहकारी शशिकांत यादव याला ६४ किलो गटात उत्तरप्रदेशच्या अभिषेक यादव याच्याकडून पुढे चाल मिळाली.
महाराष्ट्राच्या विजयदीप याला हरयाणाच्या नवीन बुरा याच्याविरुद्ध २-३ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. निखिल दुबे या स्थानिक खेळाडूने हरयाणाच्या सचिनकुमार याचा ५-० असा पराभव करीत ७५ किलो गटात आव्हान राखले.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी