ताश्कंद येथे सुरु असलेल्या ज्युनिअर एशियन वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत मावळ तालुक्यातील हर्षदा गरुड हिने सुवर्ण यश संपादन केले आहे. तिच्या या यशानंतर संपूर्ण तालुक्यातून तिचे कौतुक केले जात आहे.
उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे १७ जुलै ते २५ जुलै दरम्यान ज्युनिअर एशियन वेटलिफ्टींग स्पर्धा होत आहे. यामध्ये भारतीय संघ देखील सहभागी झाला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवण्यात यश आले. साेमवारी (१८ जुलै) रोजी झालेल्या ४५ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना हर्षदा गरूड हिने स्नॅच प्रकारात ६९ किलो आणि क्लीन आणि जर्क प्रकारात ८८ किलो असे एकूण १५७ किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.
हर्षदा गरुड ही वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुलची खेळाडू आहे. वडगाव मावळला वेटलिफ्टींगची पंढरी असे देखील संबोधले जाते. हर्षदा ही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पराशर यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टींगचे धडे घेत आहे. यापूर्वी तिने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ‘खेलो इंडिया युथ गेम्स-२०२० चे विजेतेपद पटकावलेले. त्यानंतर आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलेले. यावर्षीच मे महिन्यात ग्रीसमधील हर्क्युलेन येथे जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलेले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली होती. हर्षदा सध्या पतियाळा येथे भारतीय संघासोबत सराव करते. हर्षदाच्या या यशानंतर पुणे जिल्हा वेटलिफ्टींग संघटना तसेच समस्त मावळवासियांकडून तिचे कौतुक केले गेले. हर्षदाचे वडील शरद गरुड यांनी सांगितले, “हर्षदा लहानपणापासूनच वजन उचलण्यात तरबेज होती. तिची हीच क्षमता पाहून तिला वेटलिफ्टींगमध्ये कारकीर्द करण्यासाठी प्रोत्साहित केले.” तिच्या या सातत्यपूर्ण यशामुळे आपल्याला निश्चितपणे तिचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-