इंग्लिश प्रीमियर लीगमधील संघ वेस्ट ब्रोमविच अल्बिओन संघाने इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) कडे स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल अधिकृत तक्रार केली आहे. ३ जानेवारी रोजी वेस्ट ब्रोम विरुद्ध वेस्ट हॅम सामना होणार आहे. वेस्ट ब्रोमच्या मते, ‘वेस्ट हॅम संघाला ५ दिवसांचा अधिक आराम मिळाला आहे’. या तक्रारीसोबत वेस्ट हॅमने खेळाडूंची मेडिकल रिपोर्टदेखील जोडली आहे. या रिपोर्टनुसार, ४८ तासांच्या आत दुसरा सामना खेळत असल्याने खेळाडूंना दुखापत होण्याची भीती आहे.
वेस्ट ब्रोम संघाचे सचीव जॉन विलियम्स यांनी ईपीएलचे कार्यकारी प्रमुख रिचर्ड स्कुडामोर यांच्याशी संपर्क साधून सणांच्या काळात सामन्यांचे वेळापत्रकाबद्दल नाराजी व्यक्त केली. यावरून असे समजते की, अल्बिओन वेस्ट हॅम विरुद्धचा सामना पुढे ढकलण्यासाठी प्रयन्त करत आहे.
अनेक संघ व्यवस्थापकांनी सामन्यांच्या वेळापत्रकाबद्दल ईपीएलकडे तक्रार नोंदवली आहे की, काही संघाना जास्तीच आराम मिळत आहे आणि काही संघ यांना सणांच्या काळात जास्त सामने खेळावे लागत आहेत. या प्रकारात अल्बिओन संघाचे म्हणणे उचित आहे कारण वेस्ट हॅम संघ बॉक्सिंग डेच्या सामन्यानंतर एकही सामना खेळला नाही. ३१ डिसेंबररोजी नियोजित त्यांचा सामना सुरक्षेच्या कारणांमुळे ४ जानेवारी रोजी नियोजित केला आहे.
ईपीएलच्या गुणतक्त्याचा विचार केला तर वेस्ट हॅम आणि वेस्ट ब्रोम संघ तळाला आहेत. ते अनुक्रमे १८ आणि १९व्या स्थानावर आहेत. मागील दोन्ही वेळेस जेव्हा हे संघ आमने- सामने आले तेव्हा सामन्याचा निकाल लागलेला नाही. ११ फेब्रुवारी २०१७ रोजीचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता तर १६ सप्टेंबर रोजी झालेला सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता.