टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मधील सामना शनिवारी (22 जून) वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात खेळला गेला. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजनं अमेरिकेचा 9 गडी राखून दारूण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 19.5 षटकांत 128 धावा करून ऑलआऊट झाला होता. वेस्ट इंडिजनं 129 धावांचं लक्ष्य अवघ्या 10.5 षटकांत 1 गडी गमावून गाठलं.
या विजयासह वेस्ट इंडिजनं सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. संघानं दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला असून, एका सामन्यात पराभव पत्कारलाय. सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा इंग्लंडकडून पराभव झाला होता. सध्या इंग्लडचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्यांचे देखील वेस्ट इंडिजप्रमाणे दोन सामन्यांत 2 गुण आहेत. मात्र कॅरेबियन संघाचा नेट रनरेट इंग्लिश संघापेक्षा चांगला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी असून अमेरिका तळाशी आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. अमेरिकेचा संघ 19.5 षटकांत 128 धावांवरच गारद झाला. अँडरीज गॉस यानं सर्वाधिक (29) धावा केल्या. नितीश कुमारनं 20 धावांचं योगदान दिलं. या दोघांशिवाय अन्य एकही फलंदाज 20 धावांचा आकडा गाठू शकला नाही. वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसल आणि रॉस्टन चेस यांनी 3-3 बळी घेतले.
129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅरेबियन संघानं धडाकेबाज फलंदाजी केली. सलामीवीर शाई होपनं 39 चेंडूत नाबाद 82 धावा ठोकल्या. त्यानं आपल्या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकार हाणले. चार्ल्स (15) आणि निकोलस पूरन (नाबाद 27) यांनी त्याला चांगली साथ दिली. अमेरिकेकडून हरमीत सिंगनं एकमेव विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीचं शिक्कामोर्तब! पाकिस्तानातच होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, भारतीय संघ जाणार का?
दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं! इंग्लंडवर बाहेर पडण्याचा धोका
भारतीय संघाचं वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्रात 5 सामने खेळले जाणार; पुण्यात किती सामन्यांचं आयोजन?