भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळल्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ४ ऑगस्टपासून डरहम येथील कसोटी सामन्याने या मालिकेचा शुभारंभ होणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडमधून मोठी बातमी पुढे येत आहे. इंग्लंडच्या मैदानावर चालू असलेल्या व्हिटॅलिटी टी२० ब्लास्ट स्पर्धेतील वार्विकशायर संघाचा अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेट हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
कोरोनाच्या सावटाखाली कडक निर्बधांसह क्रिकेट सामने खेळवले जात आहेत. तरीही भारत-इंग्लंड कसोटी मालिकेपुर्वी इंग्लंडच्या मैदानावर कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.
सध्या इंग्लंडमध्ये असलेला वेस्ट इंडिजचा ३२ वर्षीय अष्टपैलू ब्रेथवेट शनिवार रोजी (०३ जुलै) कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे सांगितले जात आहे. त्याला इतर खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात आले असल्याचेही समजत आहे. परंतु अद्याप यासंबंधी कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. महत्त्वाचे म्हणजे, ब्रेथवेटपुर्वी ग्लेमॉर्गनचा निक सेल्मन आणि ससेक्सचा टॉम क्लार्कही कोरोनाच्या तावडीत सापडला होता.
Carlos Brathwaite has tested positive for Covid so he’s out of the Bears team.
— Elizabeth Ammon (@legsidelizzy) July 2, 2021
टी२० ब्लास्ट २०२१ स्पर्धेत वार्विकशायरकडून ब्रेथवेटचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का असणार आहे. आतापर्यंत ब्रेथवेटने टी२० ब्लास्टमध्ये ९ सामन्यात १८ विकेट्स काढल्या आहेत. दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ७.५३ इतका राहिला आहे. तो बुधवारी एजबेस्टन येथे यॉर्कशायरविरुद्ध झालेल्या सामन्यात सामनावीर ठरला होता. त्याने या सामन्यात केवळ २ षटके गोलंदाजी करताना ३ महत्त्वपुर्ण विकेट्स घेतल्या होत्या.
त्याच्या योगदानामुळे टी२० ब्लास्टच्या नॉर्थ गटाच्या गुणतालिकेत त्याचा वार्विकशायर संघ पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी ११ पेकी ५ सामने जिंकत ११ गुणांसह या क्रमांकावर ताबा मिळवला आहे.