झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या 2023 वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेतून शनिवारी (1 जूलै) सर्वात धक्कादायक निकाल समोर आला. सुपर सिक्स फेरीच्या सामन्यात स्कॉटलंड संघाने वेस्ट इंडिजला 7 गडी राखून पराभूत केले. यासह वेस्ट इंडीज 2023 वनडे विश्वचषकासाठी पात्र होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. पहिल्या दोन वनडे विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला आता विश्वचषकात सहभागी होता येणार नाही. मागील सात वर्षांपासून वेस्ट इंडीज क्रिकेट ज्या प्रकारे रसातळाला गेले आहे ते नक्कीच दुर्दैवी म्हणावे लागेल.
वेस्ट इंडीज संघाने 1975 व 1979 असे सलग दोन वनडे विश्वचषक जिंकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला धाक जमवला होता. त्यानंतर पुढच्या विश्वचषकातही त्यांनी अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला. यानंतर 1987 व 1996 या विश्वचषकात ते उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांना वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचता आलेच नाही. 1979 नंतर पडलेला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ 2012 मध्ये संपुष्टात आला.
डॅरेन सॅमीच्या नेतृत्वातील संघाने श्रीलंकेत झालेला टी20 विश्वचषक उंचावला. त्याच्या चार वर्षानंतर 2016 मध्ये भारतात पुन्हा एकदा हीच ट्रॉफी जिंकली. मात्र, यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेटला घरघर लागली. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र होण्यात ते अपयशी ठरले. वनडे क्रमवारी नवव्या स्थानी घसरल्याने त्यांना या स्पर्धेत भाग मिळाला नाही. 2021 टी20 विश्वचषकात पहिल्या फेरीच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत.
त्यानंतर झालेल्या 2022 टी20 विश्वचषकात त्यांच्यावर पात्रता फेरीतून बाहेर पडण्याची नामुष्की आली. त्यानंतर आता अवघ्या एका वर्षाच्या आतच वनडे विश्वचषक पात्रता फेरीत सलग तीन पराभव झाल्याने त्यांची वर्ल्डकप वारी हुकली आहे. भविष्यकाळात वेस्ट इंडीज क्रिकेट यातून कशी भरारी घेते हे पाहणे निश्चितच औत्सुक्याचे ठरेल.
(West Indies Cricket Down Fall From 2017 Now Not Qualify For ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीवरही पाहुण्या ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड! अखेरच्या दिवशी विजय 6 बळी दूर
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडची फायनलमध्ये एन्ट्री! पेनल्टी शूट आऊटमध्ये लेबनॉनवर केली मात