क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना क्रिकेटशौकिनांसाठी चर्चेचा विषय ठरत असतात. क्रिकेटपटूंचे विक्रम, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये होणाऱ्या चकमकी, आगळ्यावेगळ्या विकेट्स, अप्रतिम झेल आणि बरचं काही क्रिकेटरसिकांच्या आकर्षणाचा भाग ठरत असतं. अगदी फलंदाज, गोलंदाजांपासून ते पंचांपर्यंतही त्यांचे लक्ष असते. असेच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच होते, ज्यांच्या मैदानातील निर्णयांची जोरदार चर्चा झाली.
भारतीय क्रिकेट संघ त्यातही भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरमुळे ते खूप चर्चेत राहिले. एखाद्या गोलंदाजाने वाइड चेंडूवर चुकून सचिनची विकेट घेतली आणि त्यांच्याकडे अपील केली; तरीही ते पंच सचिनला बाद देणारच, असा चाहत्यांचा मानस झाला होता. ते पंच म्हणजे, वेस्ट इंडिजचे दिग्गज पंच ‘स्टिव्ह बकनर’ होय. आज याच बकनर यांचा ७५ वा वाढदिवस.
मे ३१, १९४६ रोजी जमैकाच्या मोंटेगो बेमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ६ फूट ३ इंच उंचीचे बकनर हे त्यांच्या पूर्ण क्रिकेट कारकिर्दीत एक क्रिकेट पंच म्हणून कार्यरत राहिले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पंचगिरीमध्ये अनेक किर्तीमान केले. परंतु त्यांच्या विक्रमांपेक्षा अधिक ते सचिनला बाद देण्यासाठी चर्चेत राहिले.
पंच बकनर यांचा जन्मच सचिनला बाद देण्यासाठी झाला होता
साल २००३ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यातील ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन गिलेस्पीने गुड लेंथवर ऑफ स्टंपच्या बाहेरुन येणाऱ्या चेंडूवर सचिनला पायचित केले होते. यावेळी पंच बकनर यांनी अनपेक्षित निर्णय घेत सचिनला बाद दिले होते. त्यांच्या या निर्णयामुळे स्वत सचिनही अचंबित झाला होता.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या एका सामन्यातही असाच काहीसा प्रसंग पाहायला मिळाला होता. सचिन फलंदाजी करत असताना पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाकच्या चेंडूवर पायचित झाला होता. परंतु त्याचा चेंडू सचिनच्या बॅटपासून खूप दूर होता. तरीही रज्जाकने अपील केल्यानंतर पंच बकनरनी सचिनला बाद घोषित केले होते. अशा बऱ्याचशा निर्णयांमुळे ‘पंच बकनर यांचा जन्मच सचिनला बाद देण्यासाठी झाला होता!’, हे वाक्य भारतीय क्रिकेटरसिकांच्या डोक्यात फिट झाले.
सलग ५ विश्वचषक अंतिम सामन्यात होते पंच
असे असले तरीही, बकनर यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत बरेचसे विक्रम केले होते. त्यांच्या आपल्या कारकिर्दीत १२८ कसोटी आणि १८१ वनडे सामन्यांमध्ये पंचगिरी केली होती. तब्बल १०० कसोटी सामन्यात पंचगिरी करणारे पहिले पंच बनण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे. याबरोबरच १९९२, १९९६, १९९९, २००३ आणि २००७ अशा सलग ५ विश्वचषक अंतिम सामन्यात ते पंचाच्या भूमिकेत होते. अखेर २००९ साली त्यांनी पंचगिरी करण्यापासून निवृत्ती घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
बासरीवादकानंतर शिखर धवन आता झाला शायर, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
आयपीएल २०२१: फलंदाजांना रहावे लागेल सतर्क, युएईतील मैदानं गाजवू शकतात ‘हे’ ५ गोलंदाज
तयारीस प्रारंभ! गांगुलीसह ‘हे’ अधिकारी दुबईत, उर्वरित आयपीएल आयोजनाबाबत करणार चर्चा