टी२० विश्वचषक शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) स्पर्धेत वेस्टइंडिज आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळवला गेला. विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ सामन्यात बांगलादेशचा सलग तिसरा पराभव झाला आहे. दोन वेळचा जेता संघ वेस्ट इंडीजने शारजाह येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशला शेवटच्या चेंडूवर ३ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे बांगलादेश संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
वेस्टइंडिज संघाने २० षटकात ७ गडी गमावून १४२ धावा केल्या होत्या, मात्र बांगलादेश संघ २० षटकात ५ गडी गमावून १३९ धावा करू शकला.
बांगलादेशची १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात फारशी बरी झाली नव्हती. त्यांनी पॉवरप्लेमध्ये २९ धावांत २ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर लिटन दास आणि सौम्य सरकारने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, सरकार १७ धावा करुन ११ व्या षटकात अकिल हुसैनच्या गोलंदाजीवर गेलकडे झेल देऊन बाद झाला. मुशफिकूर रहिमही ८ धावांवर बाद झाला. यावेळी लिटन दासने एकाकी झुंज देताना ४३ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. त्याला अखेरच्या काही षटकांमध्ये महमुद्दुलाहने साथ दिली. महमुद्दुलाहने नाबाद ३१ धावांचे योगदान दिले. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
अखेरच्या २ षटकात २२ धावांची बांगलादेशला गरज होती. यावेळी १९ व्या षटकात लिटन दास आणि महमुद्दुलाहने ९ धावा काढल्या. पण याच षटकात लिटन दास बाद झाला. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती. महमुद्दुलाहला अफिफ हुसैनने साथ दिली. मात्र, त्यांना मोठा फटका खेळण्यात अपयश आले. अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना बांगलादेशला एकही धाव करता आली नाही. परिणामी बांगलादेशला पराभवाचा धक्का बसला.
वेस्ट इंडिजकडून रवी रामपॉल, अकिल हुसेन, ड्वेन ब्रावो, आंद्रे रसल आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, बांगलादेशच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत वेस्ट इंडिजला ७ गड्यांच्या मोबदल्यात १४२ धावांवर रोखले. कॅरेबियन संघाच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केली. अपवाद मात्र, निकोलस पूरनचा राहिला. शेवटच्या षटकांत किल्ला लढवताना निकोलस पूरनने २२ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने ४ षटकार आणि एक चौकार मारून वेस्ट इंडिजला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
रोस्टन चेसने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना २९ धावा केल्या. बांगलादेशकडून फिरकीपटू मेहदी हसन, वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिझूर रहमान यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. वेस्ट इंडिज संघाच्या फिरकी गोलंदाजीविरुद्धच्या कमजोरी माहीत असल्याने बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाने ऑफस्पिनर हसनकडून डावाचे पहिले षटक टाकले. ज्यामुळे वेस्टइंडिज संघ दडपणाखाली आला.
वेगवान गोलंदाजांकडून काही षटके टाकल्यानंतर त्याने पाचव्या षटकात पुन्हा फिरकीपटूला पाचारण केले आणि त्याचा फायदा मोठा फायदा झाला. हसनने ख्रिस गेलला ४ धावांवर चालते केले. पॉवरप्लेमध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिज संघाचे दोन गडी बाद केले आणि फक्त २९ धावा दिल्या. पुढच्याच षटकात हसनने शिमरॉन हेटमायरला (९) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कायरन पोलार्ड (नाबाद १४) आणि चेस यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पोलार्डने १३ व्या षटकात फिटनेसच्या समस्येमुळे मैदान सोडले. त्याच्या जाण्याचे कारण कळू शकले नाही, पण त्याने शेवटच्या षटकात येऊन शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय वंशाचा किवी गोलंदाज टीम इंडियासाठी ठरणार मोठी डोकेदुखी? टी२०मध्ये घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
…तरच हार्दिकला न्यूझीलंडविरुद्ध मिळणार संधी? फिटनेसविषयी आली मोठी अपडेट
जीम ते इंग्लड व्हाया चेन्नई! दिनेश कार्तिक अन् दीपिका पल्लिकल यांनी अशी फुलली प्रेम कहाणी