टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार खेळाडू फॅबियन ऍलन घोट्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्याजागी अकील हुसेनचा आता वेस्ट विंडीज संघाच्या १५ नावांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याला संघात समाविष्ट करण्यासाठी टी२० विश्वचषकाच्या तांत्रिक समितीकडूनही मंजुरी मिळाली असून, राखीव यादीतही बदल करण्यात आला. आता राखीव खेळाडूंमध्ये गुडकेश मोतीला त्यात स्थान मिळाले आहे.
ऍलनची अनुपस्थिती वेस्ट इंडिज संघासाठी मोठी हानी म्हणता येईल. त्याला टी२० क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाज मानले जाते. गोलंदाजी व्यतिरिक्त तो फलंदाजीमध्येही चांगली फटकेबाजी करू शकतो. त्याचा स्ट्राइक रेट १३८ पेक्षा जास्त आहे. क्षेत्ररक्षणात देखील जगातील सर्वोत्तम नावांमध्येही त्याच्या नावाचा समावेश आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिजसाठी त्याची अनुपस्थिती एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.
सीपीएलमधील कामगिरीचे मिळाले बक्षीस
सीपीएलमध्ये या वर्षी हुसेनने खूप चांगला खेळ केला होता. त्याने त्रिबागो नाइट रायडर्ससाठी सुनील नरेनसोबत घातक गोलंदाजी जोडी तयार केली होती. त्याने स्पर्धेत ४.९२ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने वेस्ट इंडीजचे १५ टी२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेत तो खेळताना दिसला होता. टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या मोहिमेची सुरुवात सराव सामन्याने झाली. त्यांना पाकिस्तान संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यांच्या संघात मजबूत खेळाडूंची कमतरता नाही.
विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज संघ:
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरन हेटमायर, एविन लुईस, ओबेद मेकॉय, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, ओशाने थॉमस आणि हेडन वॉल्श जूनियर व अकील हुसेन
राखीव खेळाडू – डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर आणि गुडकेश मोती.






