Vinesh Phogat :- भारतीय कुस्तीपटूंनी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदक जिंकण्याची सुरुवात केली होती. तेव्हापासून भारतीय कुस्तीपटूंनी प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये किमान एक तरी पदक जिंकले आहे. गेल्या 16 वर्षात कुस्तीत भारताचा दबदबा वाढला असून, अनेक कुस्तीपटू पुढे आले आहेत. ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई खेळ यांसारख्या मोठ्या व्यासपीठांवर त्यांनी भारताचा गौरव वाढवला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहा कुस्तीपटू गेले होते. मात्र, केवळ अमन सेहरावत पदक जिंकण्यात यशस्वी ठरला. तर विनेश फोगट 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरली होती. याशिवाय उर्वरित 4 कुस्तीपटू पदक फेरी गाठू शकले नाहीत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष संजय सिंग कुस्तीपटूंच्या या खराब कामगिरीमुळे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी देशातील कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाला यासाठी जबाबदार धरले आहे.
संजय सिंग यांनी एका मुलाखतीत कांस्यपदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतचे कौतुक केले. मात्र, यावेळी त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय कुस्तीपटूंच्या कामगिरीवर खूश नसल्याचेही सांगितले. सिंग किमान 5 पदकांची अपेक्षा करत होते. संजय सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ‘कुस्तीपटू खूप चांगला सराव करत होते आणि सर्व काही ठीक चाललेले. परंतु ब्रिजभूषण सिंग यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर, सगळी परिस्थिती बदलली. याचे नुकसान आपल्याला पदकांच्या रूपाने झाले. सोबतच आपले नशीबही यावेळी काहीसे आपल्या बाजूने नव्हते.
सिंग यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र त्यांचे हे वक्तव्य विनेश फोगट हिच्याकडे निर्देश करणारे आहे. विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली अनेक कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन केले होते. या आंदोलनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली गेली. अखेर ब्रिजभूषण सिंग यांना आपल्या पदावरून बाजूला व्हावे लागले. त्यानंतर संजय सिंग यांची फेडरेशन अध्यक्ष म्हणून निवड झाली.
हेही वाचा-
बांग्लादेशकडून महिला टी20 विश्वचषकाचे यजमानपद हिसकावले जाणार, या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता
“भारत भाग्यवान आहे…” माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने केंद्रीय करार नाकारलेल्या खेळाडूंबद्दल दिली परखडं प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या दिग्गजानं सांगितले जगातील दोन आवडते खेळाडू, दोन्हीही भारतीयचं!