तब्बल दोन महिने अत्यंत धामधुमीत रंगलेल्या इंडियन प्रीमियर लीगची समाप्त झाली. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील आयपीएलने भारतीय क्रिकेटचे भवितव्य उज्वल असल्याचे सिद्ध केले. एक से बढकर एक टॅलेंट यावर्षी पुन्हा आपल्याला पाहायला मिळालं. उमरान मलिक, तिलक वर्मा, मोहसीन खान, यश दयाल, रजत पाटीदार यांनी आपल्याकडे भविष्यात भारतीय क्रिकेटची धुरा वाहण्याचे कसब असल्याची ग्वाही दिली, तर टीम इंडियाकडून खेळलेल्या काहींनी पुन्हा एकदा आपले २.० व्हर्जन दाखवले. दिनेश कार्तिकने दाखवून दिले की, फिनिशर म्हणून आपल्या नावाचा अजूनही विचार केला जाऊ शकतो. मागील काही काळापासून सातत्याने दुर्लक्ष होत असलेल्या, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल जोडीने आपल्याला अजूनही तोड नसल्याचे सिद्ध केले. यात सर्वात जास्त कडी केली हार्दिक पंड्याने. आयपीएलमधून पुनरागमन करत असलेल्या हार्दिककडे गुजरात टायटन्सचे नेतृत्व होते. ऑलराऊंडर म्हणून छाप पाडलेल्या हार्दिकने असे काही नेतृत्व केले की, पहिल्या सीझनमध्ये गुजरात चॅम्पियन बनली.
एकीकडे या युवा खेळाडूंची बात होत असताना, टीम इंडियातील सिनियर मोस्ट म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले. इतरांची चांगली कामगिरी आणि यांचे अपयश यावरून अनेक जण रोहीत-विराटच्या भवितव्याविषयी प्रश्न विचारत आहेत. मात्र, खरंच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं भविष्य काय?. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
हेही वाचा- भारतीय क्रिकेटची दिल आणि धडकन असलेले Rohit Sharma – Virat Kohliच World Cupमधून होणार बाहेर?
रोहित आणि विराटच्या भवितव्याविषयी प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे आयपीएल २०२२ मधील त्यांचा फॉर्म. त्यांची या सीजनमधील कामगिरी कशी होती याची आपण थोडक्यात माहिती घेऊ, तर कॅप्टन म्हणून सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माने सहाव्या विजेतेपदाच्या शोधात, आयपीएल २०२२ मध्ये प्रवेश केला होता. त्याची मुंबई इंडियन्स टीम नेहमीप्रमाणे यंदादेखील विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती. मात्र, सारेच फासे उलटे पडले. पहिले सलग आठ सामने गमावून त्यांच्यावर सर्वात आधी स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की आली. पुढच्या सहापैकी ४ मॅचेस त्यांनी जिंकल्या. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना सीझनचा शेवट अखेरच्या दहाव्या क्रमांकावर करावा लागला. हा झाला टीम फॉर्म. मात्र, टीमच्या या खराब कामगिरीचे कारणच कर्णधार रोहित शर्मा ठरला.
आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज असलेला रोहित धावांसाठी झगडत होता. १४ मॅचेस २६८ रन्स आणि सरासरी अगदी मामुली १९.१४. अगतिकता म्हणजे पंधरा वर्षात पहिल्यांदाच, त्याला कोणत्यातरी सीझनमध्ये साधी एक फिफ्टी मारता आली नाही.
अगदी रोहित सारखीच किंवा थोडी बरी परिस्थिती होती विराट कोहलीची. नेतृत्वाची अतिरिक्त जबाबदारी नसलेला विराट यावर्षी काहीतरी जबरदस्त करून दाखवेल अशी सर्वांना अशा होती. मात्र, विराटने या सर्व आशेवर पाणी फेरले. आरसीबी क्वालिफायर २ पर्यंत पोहोचली खरी, पण विराटने फक्त चांगभलं म्हणायचं काम केलं. १६ मॅचमध्ये ३४१ रन्स आणि सरासरी फक्त २२.७३. अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत विराट आपला जलवा दाखवेल, असे वाटत असताना त्याने निराशाच केली. अपवाद फक्त लीग स्टेजच्या अखेरच्या सामन्याचा.
याच खराब कामगिरीमुळे रोहित व विराटच्या टीम इंडियातील भविष्याविषयी प्रश्न विचारले जाऊ लागलेत. मात्र, असे असले तरी टीम इंडियातील त्यांची जागा धोक्यात आहे किंवा त्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असे काहीही होणार नाही. कारण, टीम इंडियाला पुढील वर्षभरात दोन वर्ल्डकप आणि एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळायची आहे. या सर्वांची सुरुवात इंग्लंड टूरपासून होईल. अशात लीडर्स आणि बॅटर्स म्हणून भारतीय क्रिकेटची दिल आणि धडकन असलेल्या रोहित व विराटबद्दल मोठा निर्णय घेणे म्हणजे केवळ असंभव!!! कारण, आज आऊट ऑफ फॉर्म असलेले हे दोघेच, टीम इंडियाचे सर्वात मोठे मॅच विनर आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही. ते म्हणतात ना. फॉर्म इज टेम्पररी & क्लास इज परमनंट. अगदी तसंच.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजीच्या रणांगणात कोण मारणार बाजी? मुंबईकडे ४२वे जेतेपद जिंकण्याची संधी