भारतीय क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही तो दिवस म्हणजे २५ जून १९८३. याच दिवशी भारताने पहिल्यांदा ६० षटकांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हो तेव्हा वनडे क्रिकेट ६० षटकांचे खेळवले जायचे. गमतीचा भाग असा की ६० षटके, ५० षटके व २० षटके असेही तिनही विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ जगातील एकमेव संघ.
६० षटकांचा विश्वचषक भारताने कपिल देव यांच्या तर ५० व २० षटकांचे विश्वचषक कॅप्टन कूल एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली जिंकले. परंतु पहिल्या प्रेमाप्रमाणेच पहिला विश्वचषकही खास असतो. तसेच अधुऱ्या प्रेमकहानीसारखे २००३ला अधुरे राहिलेले स्वप्नही अधूनमधून त्रास देतं असते.
२५ जून अनेक अर्थांनी भारतीय क्रिकेट इतिहासात महत्त्वाची आहे. भारताने २५ ते २८ जून १९३२ रोजी पहिल्यांदा याच लॉर्ड्स मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. आणि त्यानंतर ५१ वर्षांनी भारताने त्याच स्टेडियमवर विश्वचषक जिंकला होता.
आज जर मागे वळून पाहिले तर पहिल्या कसोटी सामन्याला आता ८८ वर्ष तर आयसीसी विश्वचषक विजयाला ३७ वर्ष झाली आहेत. विश्वचषकावर आता १९८३ हा सिनेमाही येत आहे. तर याच विश्वचषकातील एक मनोरंजक गोष्ट खास तुमच्यासाठी…
१९८३ च्या विश्वचषकातील अंतिम सामना. लॉर्ड्सच्या मैदानावर वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली. परंतु, संपूर्ण विंडीज संघ सामना खेळण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणूनच कर्णधार क्लाईव्ह लॉईड (Clive Lloyd) यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या विश्वचषकात भारतीय संघ चांगला खेळत होता. तरीही काही लोक असा विचार करीत होते की संघ नशिबाच्या बळावर पुढे जात आहे आणि असा विचार करणार्यांमध्ये विंडीज खेळाडूंचा देखील समावेश होता. म्हणूनच ते सामना हलक्यात घेत होते.
लॉईडचा यांचा विचार होता की प्रथम गोलंदाजी केल्यास भारतीय फलंदाजांना लवकर बाद करून डाव संपवू आणि त्यानंतर आपण फलंदाजी करून सामन्याचा लवकरच निकाल लावू. त्यापुर्वी त्यांच्याच नेतृत्त्वाखाली वेस्ट इंडिजने दोन विश्वचषक जिंकले होते व त्यांना हॅट्रिकची संधी होती.
लॉईड यांचा विचार अगदी बरोबर होता आणि तसं घडलं ही. भारतीय संघ १८३ धावांवर सर्वबाद झाला. के श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. बाकी सर्व फलंदाजांनी निराश केले. विंडीजकडून अँडी रॉबर्ट्स (Andy Roberts) यांनी ३ तर माल्कम मार्शल (Malcolm Marshall), मायकेल होल्डिंग (Michael Holding) आणि लॅरी गोमेझ (Larry Gomes) यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
प्रत्युत्तोरादाखल भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. धावा इतक्या कमी होत्या की जिंकण्याची काहीच आशा नव्हती. परंतु १८४ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीज संघातील फलंदाज ५२ षटकांत १४० धावाच करू शकले. यात भारतीय गोलंदाजांनी बाजी मारली होती. मदन लाल (Madan Lal) आणि मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर बलविंदर संधू (Balwinder Sandhu) यांनी २, कपिल देव (Kapil Dev) आणि बिन्नी (Roger Binny) यांनी १-१ गडी बाद केले. सामना भारताने जिंकला आणि भारतीय संघ विश्वविजेता ठरला
इंदिरा यांनी मान्य केली फारुखची इच्छा-
परंतु, हे घडत असताना, समालोचक करणारे आपली-आपली बाजू मांडत होते. भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर त्यावेळी बीबीसी रेडिओवर समालोचन करीत होते. सामना जवळपास संपत आला होता आणि समालोचन लाईव्ह चालू असताना मध्येच सोबत समालोचन करत असलेल्या ब्रायन जॉन्ससन या सहकाऱ्याने इंजिनिअर यांना विचारले, ” तुम्ही सामना जिंकत आहात, यावेळी भारतीय पंतप्रधान इंंदिरा गांधी समालोचन ऐकत असतील का?”
यावर इंजिनियर बोलले, ” नक्कीच, इंदिराजी क्रिकेटच्या चाहत्या आहेत व वेळ मिळेल तेव्हा त्या समालोचन नक्की ऐकतात. त्या या सामन्याचे समालोचनही नक्की ऐकत असतील.”
यावर फिरकी घेत ब्रायन जॉन्ससन इंजिनिअर यांना म्हणाले, ” जर भारत जिंकला तर भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी सुट्टी जाहीर करतील का?”
इंजिनियर क्षणाचाही विलंब न करता बोलले, “नक्कीच, ही भारतीय क्रिकेट व भारत देशासाठी अतिशय मोठी गोष्ट आहे.”
आश्चर्याची गोष्ट, हे समालोचन भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ऐकत होत्या. थोड्याच वेळात बीबीसीच्या मुख्यालयात फोन वाजला. तो फोन होता भारतीय परराष्ट्र कार्यालयातून. तो फोन असा होता की, ‘जर भारत विश्वचषक जिंकला तर दुसर्या दिवशी पंतप्रधान सार्वजनिक सुट्टी जाहीर करतील’.
गंमतीची गोष्ट तर पुढे होती. हा सामना शनिवारी खेळला गेला, म्हणजे दुसर्या दिवशी रविवार होता. म्हणजे इंदिराजींनी सुट्टी जाहीर केली नसती तरी सामन्याच्या दुसर्या दिवशी रविवार असल्याने सुट्टी होतीच.